चंद्रपूर (Chandrapur) :- ताडाळी औद्योगिक वसाहतीतील धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील फील्ड ऑपरेटरचा कन्व्हेअर बेल्टमध्ये दबून मृत्यू (Death)झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. कर्णधार अशोक शेळके (३७) रा. लालपेठ, भिवापूर वॉर्ड चंद्रपूर असे म़ृतक ऑपरेटरचे नाव आहे. दरम्यान मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळत नाही ताेपर्यंत मृतदेह (dead body) उचलणार नाही असा पवित्रा कामगार व कुटूंबियांनी घेतल्याने कंपनी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
आर्थिक मदतीशिवाय मृतदेह उचलण्यास तयार नसल्याने तणाव
मृतक कर्णधार शेळके हा २०१३ पासून धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत फील्ड ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. घटनेचा दिवशी कर्णधार शेळके हे कन्व्हेअर बेल्टमध्ये तपासणी करण्यासाठी गेले असता, त्यांचा बेल्ट मध्ये दबून मृत्यू झाला. ही बाब कामगारांना माहिती होताच घटनेची माहिती कंपनी प्रशासन व पोलिसांना देण्यात आली. दरम्यान मृतकांच्या कुटूंबियांनी व कामगारांनी आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यँत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान वृत्तलिहेतोवर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. या घटनेमुळे धारीवाल कंपनीतील कामगारांचा सुरक्षेचा मद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान आर्थिक मदतीशिवाय मृतदेह उचलण्यास तयार नसल्याने येथे तणाव आहे. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनाही देण्यात आली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलीस तैनात केले आहेत.