चंद्रपूर (chandrapur):- चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्याना पूर आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. दरम्यान आज शनिवार दि.२०जुलैला नागभीड तालुक्यातील विलम रोडवर असलेल्या नाल्याला आलेल्या पुरात एक ११ वर्षीय मुलगा वाहून गेला. तर दुसर्या घटनेत याच नाल्यात मात्र दुसर्या गावातून आणखी एक मुलगा वाहून गेल्याची माहिती आहे . एकाच नाल्याच्या पुरात (flood)दोन मुलं वाहून गेल्याने प्रशासनात खळबळ उडाली असून मुलाना शोधण्यासाठी गावकरी प्रयत्न करीत आहेत. भद्रावती तालुक्यातील खुटवंडा तुकूम या नाल्यावर १९ जुलैला दुपारी १२ वाजताचे दरम्यान अनिल केशवराव पेंदाम हा २० वर्षीय युवकही वाहून गेला. वृत्त लिहिपर्यंत कोणाचाही शोध लागला नव्हता.
इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरजवळ असलेले इरई धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली. येत्या २४ तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने आणि धरणातील जलसाठा वाढत असल्याने इरई धरणाचे तीन दरवाजे आज शनिवार दि.२० जुलैला दुपारी २ वाजता उघडण्यात आले. धरणाचे एक, चार आणि सात क्रमांकाचे दरवाजे ०.२५ मिटरने उघडण्यात आले. यामुळे इरई नदीकाठावरील गावे व चंद्रपूर शहरातील नदी काठलंगतच्या वस्त्यांना सतर्कता इशारा देण्यात आला आहे . पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतपूर, दामाळा, आरवट, चारवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोली, चिंचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुरला, विचोडा बुज., अंभोरा, लखमापुर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, कवठी, चेक तिरवंजा, देवाडा, चौराळा, हिंगनाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव या गावांत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला असून चंद्रपूर शहरातील रहमतनगरवासीयांनाही चंद्रपूर महानगरपालिकेकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक भागात काही मार्ग बंद असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे .
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा
चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद पडली आहे. त्यात प्रामुख्याने वरुर ते विरुर स्टेशन मार्ग तेंबुरवाही समोर नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीस बंद आहे. वरोरा तालुक्यातील वरोरा ,खरवड , दहेगाव या मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पाणी असल्याने वाहतूक बंद आहे. वरोरा, आमडी, वनली हा मार्गही बंद पडला आहे. राजुरा तालुक्यातील सुबई समोर नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे सूबई ते चिंचोली मार्ग वाहतुकीस बंद आहे.राजुरा ते सिंधी बामनवडा येथील पुलाच्या खालील माती वाहून गेल्यामुळे मार्ग बंद आहे. चिमूर तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवल्याने चिमुर ते सिंदेवाही खुटाळा मार्ग बंद आहे. चिमुर ते हिंगणघाट आणि चिमुर नांद गिरड हा मार्ग बंद आहे. वरोरा तालुक्यातील वरोरा, मोखाळा, अल्फर मार्ग बंद आहे त्यासोबतच शेगाव , आष्टा , मुधोली, शेगाव, चारगाव , खूटवंडा, शेगाव , चंदनखेडा, खुटवंडा, हे मार्ग अतिवृष्टीमुळे बंद आहेत.राज्य परीवहन महामंडळाच्या एसटी बसेस आज या मार्गावरून बंद करण्यात आल्या आहेत.