आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्यानंतर 57 कोटी रुपयांचे साहित्य खरेदी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
चंद्रपूर (Chandrapur) : येथील मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेत गुरुवारी मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Minister of Medical Education Hassan Mushrif) यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीत 57 कोटी रुपयांचे फर्निचर खरेदी करण्याचे निर्देश एचबीसीसी कंपणीला (HBCC Company) देण्यात आले आहेत तसेच, इतर वैद्यकीय उपकरणांसाठी विविध विभागांमार्फत निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या (Medical College) साहित्य खरेदी प्रक्रियेला वेग मिळाला आहे. या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishore Jorgewar), वैद्यकिय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकिय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाले यांच्यासह संबंधित विभागाचे उप सचिव आणि अवर सचिवांची उपस्थिती होती. नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदारसंघातील (Chandrapur Constituency) प्रश्न सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
चंद्रपूर मेडिकल कॉलेजची सुमारे 50 एकरातील नवीन वास्तू पूर्णत्वास आली असली तरी वैद्यकीय साहित्य (Medical Materials) आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध नव्हता. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे आणि गैरसोय होत आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. तसेच हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून गुरुवारी मंत्रालयात (Ministry) उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत फर्निचर खरेदीसाठी 57 कोटी आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी 41 कोटी रुपये असा एकूण 100 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी फर्निचर खरेदीचे निर्देश एचबीसीसी कंपनीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तर इतर साहित्य खरेदीसाठी निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच दुसरी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.