भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे आवाहन
वाशिम (Chandrasekhar Bawankule) : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Lok Sabha Elections) नेत्यांनी संविधान बदलविणार, आरक्षण यासह अनेक विषयांवर फेक नेरेटिव्ह तयार करून मतदारांना संभ्रमित केले. विरोधक केवळ आपल्या निष्क्रियतेमुळे यामध्ये काही प्रमाणात यशस्वी झाले .परंतु केंद्रातील व राज्यातील डबल इंजिन सरकारने जनहिताच्या अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सकारात्मक प्रचार करा व अराजकता पसरविणार्या विरोधी मायावी शक्तींना ताकदीने उत्तर द्या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले .येथील तिरुपती लॉन येथे जिल्हा भाजपातर्फे विस्तारित कार्य समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,त्याप्रसंगी ते बोलत होते.
विस्तारित कार्य समिती बैठकीत मार्गदर्शन
यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) ,प्रदेश महामंत्री आ.रणधीर सावरकर ,खा.अनुप धोत्रे ,आ. लखन मलिक, माजी आ. विजयराव जाधव ,प्रदेश कार्यकारणी सदस्य राजू पाटील राजे, जिल्हाध्यक्ष श्याम बढे, माजी खा. अनंतराव देशमुख,ज्ञायक पाटणी, गजानन घुगे ,माजी महापौर विजय अग्रवाल, माजी आ.पुरुषोत्तम राजगुरू ,प्रदेश सचिव शुभदा नायक, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माया वाघमारे, जिल्हा महामंत्री हेमलता विसपुते, पुरुषोत्तम चितलांगे, नरेंद्र गोलेच्छा यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ७० वर्षांत जी कामे झाली नाही ती केवळ दहा वर्षात करून दाखविली .अनेक चांगल्या योजना आणल्या. या योजना गरीब, वंचित वर्गापर्यंत पोहोचल्या सुद्धा. परंतु लोकसभा निवडणुकीत आपण कमी पडलो. राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक झालीच नाही .आघाडीतील नेत्यांनी लोकल मुद्द्यांवर अराजकता तयार केली. संविधान बदलणार यासह लोकल प्रश्नांवर मतदारांची डोकी खराब केली .परंतु आता पुढील दोन महिने प्रत्येक कार्यकर्त्यांने ताकदीने कामाला लागणे गरजेचे आहे .पंतप्रधान मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दररोज १८ ते २० तास काम करतात. आपल्याला फक्त दोन महिने द्यायचे आहे .
यापुढे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह रहा. फेक नेरेटिव्हला आपल्या सरकारने केलेल्या चांगल्या योजनांच्या सकारात्मक कामाने उत्तर द्या, असे बावनपुळे म्हणाले. राहुल गांधी यांनी हिंदू आतंकवादी म्हटले .हिंदू म्हणजे हिंसा असल्याचे म्हटले. हिंदूंना दुर्बल करण्याचा प्रयत्न होत आहे .देशात विध्वंस घडविणार्या काही विदेशी शक्ती काम करीत आहेत .विदेशी पैशावर काम करणार्या अनेक संस्थांचे हुक्कापाणी पंतप्रधान मोदी यांनी बंद केले .त्यामुळे विदेशी शक्ती द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे बावनकुळे म्हणाले . पक्षात चमकोगिरी करू नका .डेपुटेशन आणून उमेदवारी मिळत नाही. बावनकुळे व फडणवीस नव्हे तर गावातील जनता उमेदवारी कोणाला द्यायची ते ठरविणार आहे.त्यामुळे काम करणार्या कार्यकर्त्याला घरबसल्या उमेदवारी मिळेल. उमेदवारीसाठी धावपळ न करता पक्षाच्या विजयासाठी धावपळ करा असे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या चांगल्या जनहिताच्या १५ योजना बंद केल्या. त्यामुळे लाडकी बहीण यासह शेतकर्यांना मोफत वीज बिल या योजनांबाबत सुद्धा विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील .त्यामुळे कार्यकर्त्यांनी यापुढे कशा पद्धतीने विरोधकांचा समाचार घ्यायचा आहे, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आ. सावरकर, खा. धोत्रे ,आ. मलिक ,विजयराव जाधव ,राजू पाटील राजे ,अनंतराव देशमुख, ज्ञायक पाटणी, पुरुषोत्तम राजगुरू यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्या मार्गदर्शनात अनेकवेळा स्व.राजेंद्र पाटणी यांच्या कामाचा उल्लेख केला. स्व. पाटणी यांच्या संपर्कात मी ३२ वर्ष होतो. सर्वांना प्रवाहात आणण्याचे काम पाटणी यांनी केले व जिल्ह्यात प्रचंड शक्ती उभी केल्याचे गौरवोद्गार काढले .या अधिवेशनात कारंजा व मानोरा तालुक्यातील माजी सभापती यांच्यासह शेकडो जणांनी भाजपात प्रवेश घेतला. कार्यक्रमाचे संचलन महिला आघाडी जिल्हा महामंत्री हेमलता विसपुते व जिल्हा महामंत्री सुनील काळे यांनी केले.
जनहिताच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा- आ. रणधिर सावरकर
केंद्र व राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. विरोधक चुकीची माहिती पसरवीत असताना आता लोकसभेप्रमाणे शांत बसून चालणार नाही. केवळ भाषणातून निवडणुका जिंकता येत नाही.प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. महायुती सरकारच्या चांगल्या योजनांची माहिती खाली पाझरली पाहिजे, असे आवाहन आमदार रणधिर सावरकर यांनी केले.