केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची दुर्गापूर येथे ना. मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
देशोन्नती वृत्तसंकलन
चंद्रपूर (Nitin Gadkari) : काँग्रेसने लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाकडून संविधान बदलविला जाणार असल्याचा अपप्रचार करण्यात आला त्याचा समाचार घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी संविधान कोणी बदलविणार नाही आणि आम्ही कुणाला बदलवू देणार नाही, अश्या शब्दात विरोधकांवर प्रहार केला. ते आज बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे आयोजित सभेत बोलत होते.
गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले की, मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम आणि योजना आणल्या. त्यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन अधिक वेगाने धावण्यासाठी पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन केले. ना. गडकरी म्हणाले, ‘मी ४० वर्षांपासून चंद्रपूरला येतोय.
गेल्या काळात चंद्रपूर पूर्णपणे बदलले आहे. प्रत्येक क्षेत्रात सुधीरभाऊंनी अत्यंत चांगले काम केले आहे. आपल्या भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक योजना, प्रत्येक उपक्रम त्यांनी राबविला. ‘२०१४ पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. मात्र गेल्या दहा वर्षांत ४७४ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग नव्याने निर्माण झाले. याचे श्रेय सुधीरभाऊंनाच आहे. आता सुधीरभाऊंच्याच प्रयत्नांमुळे समृद्धी महामार्गालाही चंद्रपूरशी जोडले जाणार आहे, याचाही ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी आवर्जून उल्लेख केला.
प्रत्येक पाऊल मतदारसंघाच्या विकासासाठी – ना. मुनगंटीवार
मी गडकरींचा शिष्य आहे. जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्धआहो. आम्ही सदैव विकासाचे राजकारण करतो, जातीवादाचे नाही. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझे प्रत्येक पाऊल मतदारसंघाच्या विकासासाठी आहे, असा निर्धार ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पाच हजार घरकुल आणले. कुणीही कच कच्च्या घरात राहणार नाही, याचा निर्धार मी केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एनटी कुणीही असले तरीही पक्के घरकूल देणारच आहे, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मित्तल ग्रुपसोबत ४० हजार कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. पाच हजार एकरमध्ये हा उद्योग उभा होणार आहे. यातून २० हजार थेट तर ८० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत, असेही ते (Nitin Gadkari) म्हणाले.