चारठाणा येथील चौथ्या पुलाजवळ रात्री घडला अपघात
परभणी/चारठाणा (Charthana Accident) : नांदेड – छत्रपती संभाजी नगर राज्य महामार्गावर चारठाणा जवळील चौथा पुल या ठिकाणी गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या मध्ये एक जण मयत झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
गिरगाव येथील रस्त्याचे काम करुन दुचाकीने शंकर यादवराव लोकडे, विनोद लिंबाजी कोकाटे हे दोघेजण दुचाकीने केहाळकडे जात होते. यावेळी त्यांना चौथ्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकीवरील शंकर लोकडे हा पुलावरुन करपरा नदीत पडला तर विनोद कोकाटे हे पुलाच्या कठड्याजवळ जाऊन पडले. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सपोनि. सुनील अंधारे, विष्णूदास गरुड, सुनील वासलवार, पवन राऊत, शेख जिलानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विनोद कोकाटे याला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शंकर लोकडे याचा पुलाखाली शोध घेण्यात आला. मात्र ते मिळून आले नाही. त्यानंतर नदीपात्रात शोध मोहिम राबविली असता रात्री दहाच्या सुमारास शंकर लोकडे याचा मृतदेह मिळून आला. जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाती मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी गुन्हा
पाथरी : पाथरी ते पोखर्णी रोडवर रेणापुर पाटीजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये प्रदीप शिंदे यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी प्रकाश पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिकअप चालक सुरेंद्रसिंग परमार याच्यावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाती मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पाथरी पोलीस अधिक तपास करत आहेत.