राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प!
लातूर () : ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय, आली मुंडके वर पाय’, यासह विविध घोषणा देत सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी लातूर येथे औसा रोडवर सोमवारी सकाळी 11 वाजता छत्रपती चौकात अखिल भारतीय छावा संघटनेने (Chhaava Rasta Roko Andolan) रास्ता रोको आंदोलन केले. संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जवळपास अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलनावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एक महिनाभरापूर्वी संघटनेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्याचे कुणालाही सोयर सुचत नाही. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिके वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी पशुहानी झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला गेला. इतकी गंभीर परिस्थिती असताना सरकारचे याकडे लक्ष नाही.
राज्यातील शेतकरी अशा घटनांमुळे पुरता खचून गेला असून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे, असे म्हणत यावेळी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी सरकारला गांभीर्य नाही, अशी टीका केली. सरकारने या (Chhaava Rasta Roko Andolan) आंदोलनावर तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी, क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक महामंडळ तात्काळ स्थापन करावे, यासह विविध मागण्यांचा उल्लेख केला.
लातूर जिल्ह्याच्या अनेक भागात ढगफुटी झाली असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचे मंत्री सत्ताधारी आमदार अधिकारी कुणीही शेत शिवारात धावले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळप एक करण्याचे काम सध्या सरकार करत आहे, असा आरोप करीत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, तातडीने कर्जमाफी करावी आणि अण्णासाहेब जावळे पाटील महामंडळ स्थापण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा राज्यातील संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा इशारा नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी दिला.
17 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या…
17 सप्टेंबरपर्यंत सरकारने याबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा (Chhaava Rasta Roko Andolan) छावा संघटना राज्यभर तीव्र आंदोलन शेडेल, असा इशारा यावेळी जावळे पाटील यांनी दिला. याबाबत दिलेल्या निवेदनावर नानासाहेब जावळे पाटील यांच्यासह अ.भा. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख संजय राठोड, जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील बिडवे पाटील, शहराध्यक्ष बालाजी निकम, अरविंद गाडे राजू नरके, लातूर तालुकाध्यक्ष रमाकांत भैय्या जाधव आदींसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.




