लातूर (Latur) :- मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये 115 पदांची भरती करून बेरोजगारांना सहा महिने रोजगार देण्याची योजना सुरू केली खरी, मात्र या योजनेत भरती झालेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना भरती झाल्यापासून म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून मानधनच दिले गेले नाही. परिणामी राज्यातील बेरोजगारांची सरकारने ससेहोलपट चालविण्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून हजारोंना मिळेना विद्यावेतन!
दरम्यान लातूर जिल्ह्यातील अनेक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी लातूरच्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना मंगळवारी एक निवेदन दिले असून तीन महिन्यांचे रखडलेले मानधन तात्काळ द्यावे, अशी मागणी केली आहे. शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली. त्यामुळे लातूर जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये १ हजारांवर पदांची भरती झाली. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिने रोजगार मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असून प्रशिक्षण काळात इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय(ITI), पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन आहे.
मात्र गेली तीन महिन्यांपासून या योजनेत काम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना अद्याप रुपयाही मानधन दिले गेले नाही यामुळे बेरोजगारांची ससेहोलपट होत असून याकडे प्रशासनाचेच नव्हे तर राज्यकर्त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे.
32 जणांनी दिले निवेदन
या प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विभागामार्फत विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी त्यावेळी आढावा बैठकांमधून जाहीर केले. मात्र विद्यावेतन अद्याप मिळाले नसल्याने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील (Department of Education) युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी एक निवेदन दिली आहे आपणास तात्काळ विद्यावेतन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे या निवेदनावर जवळपास 32 जणांच्या सह्या आहेत.