३१ नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये बालविवाह कारणीभूतची शक्यता
ऋषी सुखदेवे
अहेरी (Child Marriage) : तालुक्यातील देचलीपेठा, जिमलगट्टा व कमलापूर या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतरही ठिकाणी मागील वर्षात १५ ते १९ वयोगटातील ४० गरोदर मातांची नोंद करण्यात आली. धक्कादायक म्हणजे यात १६ अल्पवयीन मुलींचा बालविवाह पालक व बालकांच्या जनजागृती अभावी झाल्याने तालुक्यात ३१ नवजात अर्भकांच्या मृत्यूमध्ये सदर बाब कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीच्या तालुका आरोग्य विभागाच्या अहवालावरून २४ तासांमध्ये ११ नवजात तर सात दिवसापर्यंत मृत्यू पावलेल्या (Child Marriage) नवजात बालकांची संख्या ५ असल्याचे निदर्शनास आले आहे.
बालविवाह रोखण्यासाठी २००६ सालापासून बालविवाह प्रतिबंध कायदा (Child Marriage) लागू केला आहे. १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचा विवाह करणे या कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम लक्षात घेता सदर बाब रोखण्यासाठी यामुळे बाधित झालेल्या मुला-मुलींना संरक्षण मिळते.
मात्र तालुक्यात १६ अल्पवयीन गरोदर मातांच्या नोंदीने पालकांमध्ये कायदा व त्यांच्या बद्दलची शिक्षेची जनजागृती करणे गरजेचे आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ८ ते २८ दिवसापर्यंतच्या ३ तर त्यानंतर वर्षभरात १२ नवजाताना आपले प्राण गमवावे लागले. अशा कारणांना बालविवाह कारणीभूत असेल तर बालविवाह करणार्यास व त्यास सहभागी होणार्यास दोन वर्षापर्यंतची सक्त मजुरी व एक लाखापर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मजूर, आदिवासी, दुर्गम भागातील नागरिकांना या संदर्भात पुरेशी माहिती नाही तसेच प्रशासकीय यंत्रणाही तोकडी पडत असल्याने दुर्गम भागात अद्यापही (Child Marriage) अल्पवयीन मुलींचे विवाह होत असल्याची बाब अधोरेखीत झाली आहे. असले तरी तालुक्यातील अर्भक मृत्यू दर १२.८ प्रतिशत असून हा सरासरी राज्याच्या १६ प्रतिशत पेक्षा कमी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
स्थानीक पातळीवरील कर्मचार्यांचा कानाडोळा कारणीभूत
स्थानीक पातळीवर आता आशा वर्कर, आरोग्य सेविका, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी असे शासकीय कर्मचारी आहेत. शासनाने सबंधित ठिकाणी अल्पवयीन मुला -मुलींचा विवाह झाल्याचे आढळून आल्यास सबंधितावर कारवाई करण्याचे आदेश यापुर्वीच दिले आहेत. असे असतांनाही गेल्या वर्षीच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून १६ अल्पवयीन मुलींचा विवाह (Child Marriage) झाल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होऊन अर्भक मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी स्थानीक पातळीवरील कर्मचार्यांचा कानाडोळा कारणीभूत असल्याने सबंधितावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
