हिंगोली (Chinese manja) : हिंगोली शहर व परिसरात संक्रांतीच्या मुहुर्तावर पतंग उडविण्यासाठी वापरलेल्या चिनी मांजामुळे तिघांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजी घडली आहे. त्यापैकी एकावर खाजगी रुग्णालयात तर दोघांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे हिंगोली शहर पोलिसांनी शहरातून (Chinese manja) चिनी मांजाची पाच बंडले जप्त केली आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशीच पतंग उत्सवाला मांजामुळे गालबोट लागले आहे.
हिंगोली शहर व परिसरात संक्रांती निमित्त १४ जानेवारी रोजी सकाळपासूनच पतंग उडविण्यास व काटाकाटी खेळण्यास सुरवात झाली होती. प्रत्येत जण घराच्या छतावर गाणे लाऊन पंतग उडविण्याचा व काटाकाटी खेळण्याचा आनंद घेत होते. मात्र पतंगबाजांचा हा आनंद सर्व सामान्यांसाठी जायबंदी होणारा ठरला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शेख शेरू हे त्यांच्या दुचाकी वाहनावर खरबी येथून हिंगोलीकडे येत होते. यावेळी (Chinese manja) चिनी मांजामुळे त्यांचा गळ व मान कापल्या गेली. यामुळे अतिरक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तातडीने हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केला. या ठिकाणी त्यांच्या गळ्यावर व मानेवर २५ टाके पडले असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.
या शिवाय अन्य एका घटनेमुळे इसापूर धरणा येथील राहूल काबंळे हे दुचाकी वाहनावर हिंगोलीत येत असतांना (Chinese manja) चिनी मांजामुळे त्यांच्या गळ्या कापल्या गेल्या. त्यांना तातडीने शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्या गळ्यावर सुमारे १५ पेक्षा अधिक टाके पडले आहेत. या शिवाय अन्य एका व्यक्तीलाही मांजामुळे गळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावरही शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार धनंजय क्षिरसागर, संभाजी लकुळे, संजय मार्के यांच्या पथकाने तातडीने पतंग विक्रीच्या दुकानांवर जाऊन तपासणी केली. यामध्ये एका दुकानातून चिनी मांजाचे पाच बंडल जप्त केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.