परभणी/गंगाखेड (Gangakhed City Council) : नगर परिषदेच्या घंटागाडीवर असलेल्या चालकाने त्यास रस्त्यावर सापडलेली पर्स परत दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की. पुणे येथे राहणाऱ्या प्रियंका राजेश कऱ्हाळे वय ३० वर्ष या गुरुवार २६ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील पिंप्री येथे त्यांच्या मावशीला भेटून स्कुटीवरून परत गंगाखेडकडे येत असतांना पिंप्री ते झोला या गावा दरम्यान त्यांच्या जवळील पर्स रस्त्यात गहाळ झाली. हरवलेल्या या पर्समध्ये मोबाईल व रोख रकमेसह अन्य महत्वाची कागदपत्रे असल्यामुळे दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास त्यांनी याची माहिती (Gangakhed City Council) गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली व त्या नातेवाईकांकडे गेल्या तेंव्हा पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, ठाणे अंमलदार संभाजी शिंदे यांनी पिंप्री येथील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून पर्सची शोध मोहीम सुरु केली.
याच दरम्यान गंगाखेड नगर परिषदेच्या (Gangakhed City Council) घंटागाडीवरील चालक शेख मैनोद्दीन शेख ताजोद्दीन वय ३० वर्ष रा. महेबूब नगर गंगाखेड, अनिल रघुनाथ भालेराव वय ३४ वर्ष रा. अजिंठा नगर गंगाखेड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात येऊन पिंप्री रस्त्यावर कचरा डेपोजवळ पर्स सापडली व त्यात मोबाईल व रोख रकमेसह काही कागदपत्रे असल्याची माहिती देऊन पर्स ठाणे अंमलदार संभाजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द करून आपला प्रामाणिकपणा दाखविला असता पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर यांनी प्रियंका राजेश कऱ्हाळे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत ठाणे अंमलदार संभाजी शिंदे, महिला पोलीस जमादार संगिता केदारे यांच्या हस्ते पर्स परत दिली. यावेळी उपस्थित अमजद खान पठाण, रामेश्वर बचाटे यांनी घंटा गाडीवरील चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले तर हरवलेल्या पर्समधील मोबाईल, पैसे व सर्व कागदपत्रे व्यवस्थित परत मिळाल्याने प्रियंका कऱ्हाळे यांनी आभार मानले.




