तळप बु शिवारातील प्रकार, पिके आली पाण्याखाली!
मानोरा (Cloudburst) : तालुक्यात दि. २८ ऑगस्ट पासून २४ तास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मानोरा तालुक्यात अक्षरशः ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शहरासह तालुक्याला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, तळप बु शिवारात नाल्याचे पाण्याचे पूर (Flood) शेतात वाहिल्याने प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नदी, नाला काठची जमीन खरडून जात पुराने पिक गेले वाहून!
मौजे तळप बु शिवारात ढगफुटी (Cloudburst) सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतकरी सुरेश दत्तराम इंगोले, बंडू महादेव इंगोले, सागर भगीरथ शर्मा, नंदू रावजी, सिताराम घाशीराम पवार यांची शेती खरडून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. सलग दोन दिवसापासून तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अरुणावती, पूस नदीसह नदी नाल्याला आलेल्या पुराने पाणी साचून शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. तर नदीकाठी असलेल्या अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे मानोरा तालुक्यातील शेतात पुराचे पाणी घुसले आहे, ज्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी सामुहिक मागणी!
सलग दोन दिवस पावसाने कहर केल्याने अरूणावती, पूस व खोराडी नदीला महापुराचे स्वरूप आले होते. नालेही दुथडी भरून वाहल्याने शेतातील उभी पिके पाण्याखाली आली आहेत. शासनाने दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी सामुहिक मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.
शासन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश अद्यापही दिलेले नाहीत!
मागील पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्हयात वाशिम, रिसोड, मालेगाव तालुक्यात शासनाने प्रशासनाला पंचनामे सुरू आहेत. मात्र ढगफुटीचा व सततचा पाऊस मानोरा तालुक्यात तांडव माजवित असुनही शासन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश अद्यापही दिलेले नाहीत. यासाठी मतदार संघातील दोन भाजपाचे आमदार कुठलेही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना (Farmers) सोबत घेऊन आंदोलन करू असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश संघटक, तथा माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले व बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केले.
