सन २०१७-१८ व २०१८-१९ दोन वर्षाचे पुरस्कार प्रलंबित
हिंगोली (CM Eknath Shinde) : राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम (Tantamukt Gaav mohim) राबविण्यात आली होती. या योजनेला प्रसिद्धी देणार्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जात होते; परंतु सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षाचे प्रस्ताव पत्रकारांकडून जिल्हा प्रशासनाने स्विकारल्यानंतरही त्याची घोषणा झाली नव्हती. या संदर्भात मार्चमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आले असता त्यांना याबाबत निवेदन देऊनही अद्यापपर्यंत या पुरस्काराची घोषणा झाली नाही.
सन २००७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.आर. आर.पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम (Tantamukt Gaav mohim) सुरू केली. यामध्ये गावागावातील लहान-सहान तंटे गावामध्ये मिटविले जात होते. योजनेला प्रसिद्धी देणार्या पत्रकारांना राज्य, विभाग व जिल्हास्तरावर पुरस्कार ठेवण्यात आले होते. त्यामुळे या या मोहिमेला चांगलीच गती मिळाली होती. सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत स्विकारण्यात आले होते. प्रस्तावाची जिल्हास्तरीय समितीने छाननी करून विभागीय स्तरावर निवड झालेले प्रस्ताव पाठविले होते. कालांतराने कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे जिल्हा प्रशासनाने या पुरस्काराचे प्रस्ताव स्विकारलेच नव्हते; परंतु मागील दोन वर्षाचे प्रस्ताव पत्रकार सुधीर गोगटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले होते.
प्रलंबित पुरस्काराची घोषणा होत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय तसेच मंत्रालयात गृह विभागालाही वेळोवेळी निवेदन दिले होते तरी देखील या निवेदनाची दखल कुठेही घेण्यात आली नाही व पुरस्काराची घोषणा देखील करण्यात आली नाही. लोकसभा २०२४ निवडणूक आदर्श आचार संहिता लागण्यापूर्वी हिंगोली शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आले असता प्रत्यक्षात त्यांची पत्रकार सुधीर गोगटे व इतर पत्रकारांनी भेट घेऊन निवेदन दिले होते. या बाबीला जवळपास पाच महिने उलटले तरी अद्यापही शासन स्तरावरून पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा झाली नाही. त्यामुळे या प्रलंबित असलेल्या पत्रकारांच्या पुरस्काराच्या घोषणेकरीता आणखी किती प्रतिक्षा करावी लागणार, हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
गतिमान प्रशासनाकडून पुरस्कारासाठी प्रतिक्षाच
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात गतिमान प्रशासन काम करीत आहे. विकासाचा ध्यास असलेल्या प्रशासनाकडून पत्रकारांच्या महात्मा गांधी (Tantamukt Gaav mohim) तंटामुक्त गाव मोहीम पुरस्काराच्या घोषणेची पत्रकारांना प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लक्ष घालावे अशी मागणी राज्यातील पत्रकारांतून केली जात आहे. म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नाकरीता राज्याच्या गृह विभागासह हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात यापूर्वी वेळोवेळी निवेदन देण्यात आले.