विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची माहिती
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला नागपूर विभागात १२ लाख १५ हजार ९९० लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेमध्ये (CM Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला आहे. योजनेच्या लाभासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (Vijayalakshmi Bidari) यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ (CM Ladki Bahin Yojana) च्या सहनियंत्रण व आढावा घेण्याकरिता जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर तीन अशासकीय सदस्य असलेली समिती गठीत करण्यात आली असुन या समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसीलदार हे काम पाहणार आहे. या समितीकडे योजनेची देखरेख व सनियंत्रण करणे, योजनेचा नियमित आढावा घेणे, तसेच या योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबरोबर ग्रामिण स्तरावर प्राप्त झालेले अर्ज, त्यांची छाननी व तपासणी करणे तसेच अर्ज सोबतच्या कागदपत्राची पडताळणी करणे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या समिती मध्ये दहा सदस्यांचा समावेश आहे. नागपूर विभागात ६ लाख १८ हजार ५३९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ऑफलाईन पध्दतीने ५ लाख ९७ हजार ४५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अडचण येणार नाही यासाठी १५ हजार ३११ मदतकेंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रावर १५ हजार ३४२ मनुष्यबळ नियुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करण्यासोबतच त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली असून महिला आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांना आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणणार्या या (CM Ladki Bahin Yojana) योजनेमध्ये महिलांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (Vijayalakshmi Bidari) यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत (CM Ladki Bahin Yojana) जिल्हानिहाय प्राप्त झालेल्या अर्जामध्ये नागपूर जिल्ह्यात ३ लाख ५० हजार ९२७ अर्जाचा समावेश असून यामध्ये १ लाख २४ हजार ४५८ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले तर २ लाख २६ हजार ४६९ ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात ८५ हजार ९२० अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये ६५ हजार ८७८ ऑनलाईन तर २० हजार ४२ ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ४ हजार ८१५ अर्ज प्राप्त झाले असून ७२ हजार ९९१ अर्ज ऑनलाईन तर ३१ हजार ८२४ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख २१ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये १ लाख ८० हजार ६५ अर्ज ऑनलाईन तर १ लाख ४१ हजार ७८० अर्ज ऑफलाईन पध्दतीने प्राप्त झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ३८४ अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये १ लाख ४ हजार २३२ अर्ज ऑनलाईन तर ६४ हजार १५२ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ८४ हजार ९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ७० हजार ९१५ अर्ज ऑनलाईन तर १ लाख १३ हजार १८४ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत.