देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (CM Ladki Bahin Yojana) : लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना बँकेचे खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक लाभार्थ्यांचे बँकेचे खाते आधार लिंक नसल्याने व्यवहारांचा खोळंबा झाला आहे. या अनुषंगाने लाभार्थ्यांचे बैंक खाते आधार लिंक करण्यासाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी नियोजनाचा बट्ट्याबोळ झाल्याचे निदर्शनास आले. वर्धा पंचायत समितीमध्ये नेटवर्कची अडचण आली होती तर काही बँकांचे कर्मचारीच उशिरापर्यंत आले नव्हते. त्यामुळे लाभार्थ्यांची मात्र फरफट होत आहे.
पंचायत समितींमध्ये शिबिराचे आयोजन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (CM Ladki Bahin Yojana) वर्धा जिल्ह्यातील ज्या लाभार्थी महिला पात्र ठरलेल्या आहेत, मात्र अद्यापही लाभाची रक्कम बैंक खात्यात जमा झाली नाही. अशा लाभार्थ्यांकरिता बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी २२ आणि २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ४ यावेळेत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पात्र लाभार्थ्यांनी (Wardha Panchayat Samiti) पंचायत समिती कार्यालयात आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची मूळ प्रत सोबत घेऊन जावी आणि आधार क्रमांक बैंक खात्याशी तात्काळ संलग्न करून बँक खाते अद्ययावत करावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार अनेक लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठले.
नियोजनाअभावी लाभार्थ्यांची फरफट
वर्धा पंचायत समितीच्या (Wardha Panchayat Samiti) सभागृहातही मोठ्या संख्येने लाभार्थी (CM Ladki Bahin Yojana) आले होते. यावेळी लाभार्थ्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागला. शिबिर असल्याने लाभार्थ्यांनी पंचायत समितीचे सभागृह गाठले. तेथे मोठ्या संख्येने महिला लाभार्थी आल्या होत्या. पण, नियोजनच नसल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला येथे वायफाय कनेक्टीव्हीटीची सुविधा उपलब्ध नव्हती. कालांतराने नेट कनेक्ट झाले. पण, वेग सावकाश असल्याने अडचणी येत होत्या. सभागृहात हे शिबिर आयोजित होते. त्यावेळी सभागृहाच्या एका भागात बसलेल्या बैंक कर्मचाऱ्याला तेथे स्पीकर लावल्या गेल्याने मध्येच दुसरीकडे टेबल लावावा लागला. त्यात लाभार्थ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. सभागृहात काही पंखेही बंद होते. ज्या विद्युत बोर्डजवळ कर्मचाऱ्यानी संगणक लावले तेथे पंखा नसल्याने कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
- जिल्ह्यातील आठही पंचायत समितींमध्ये याबाबत शिबिर आयोजित होते. पण, काही ठिकाणी नियोजनच नसल्याने लाभार्थ्यांची अडचण झाली. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
- वर्धा पंचायत समितीमध्ये (Wardha Panchayat Samiti) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. त्यांच्याही या बाबी निदर्शनास आल्यात.
- वर्धा येथे शिबिर सुरु झाल्यानंतर एक ते दीड तास उशिरापर्यंत काही बँकांचे अधिकारी, कर्मचारी शिबिरस्थळी आले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करताना लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता.
- बँक खाते आधारला संलग्न करण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच लाभार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
- या अनुषंगाने प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.