बँकेमध्ये ढिसाळ; कामकाजाचे निघाले वाभाडे
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : एकीकडे बहीण भावाचा पवित्र सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतील रक्कम काढण्यासाठी व आधार लिंक करण्याकरीता राखी पौर्णिमेलाही सोमवारी हजारो लाडक्या बहिणींनी बँकेत तळ ठोकला होता. राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojana) ही योजना अंमलात आणली आहे. योजनेमध्ये पहिला हप्ता ३ हजार रूपयाचा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. राखी पौर्णिमेपूर्वीच अनेक बहिणींच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग झाल्याने प्रत्येक दिवशी बँकांमध्ये बहिणींची गर्दी होत आहे.
विशेष म्हणजे १९ ऑगस्ट सोमवार रोजी बहीण भावाचा पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणार्या राखी पौर्णिमेलाही सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींनी घरातील कामे बाजूला सारून बँकेमध्ये तळ ठोकला. ज्यामध्ये काही बहिणी योजनेतील (CM Ladki Bahin Yojana) रक्कम काढण्याकरीता तर काही बहिणी आधार लिंक करण्याकरीता दिवसभर रांगेमध्ये उभ्या होत्या. हिंगोली जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत २ लाख ७५ हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहे. त्यापैकी १ लाख ७६ हजार ७९४ लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरले आहेत. अर्जातील काही त्रुटीमुळे तात्पुरत्या स्वरूपात अर्ज नामंजूर झाले असून त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्याही बँक खात्यात रक्कम वर्ग होणार आहे. या योजनेतील रक्कम काढण्याकरीता अनेक महिलांनी बँकांमध्ये गर्दी केली. सोमवारी मुसळधार पाऊस असतानाही अनेक महिला बँकेसमोरील रांगेमध्ये भिजत उभ्या होत्या. बँकेत ग्राहकांसाठी अपुरी व्यवस्था आहे.
काहींना आनंद काही निरूत्साही….
या (CM Ladki Bahin Yojana) योजनेत ज्या महिलांना रक्कम मिळाली त्या आनंदीत तर ज्यांना रक्कम आली नाही त्या महिला मात्र निरूत्साही दिसून आल्या.