मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : जिल्ह्यातील ३ लाख १३ हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये (CM Ladki Bahin Yojana) ऑनलाईन अर्ज दाखल केले. ज्यामध्ये जवळपास ३ लाख ७ हजार महिलांचे प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविले होते. ज्यामध्ये बहुतांशी महिलांच्या बँक व डाक विभागातील खात्यावर रक्कम जमा झाली. अद्याप २९ हजार बहिणी लाभापासून वंचीत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक आचार संहितेमुळे धास्तावल्या आहेत.
शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) चालू करून महिला व युवतींना दिलासा दिला आहे. या योजनेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख १३ हजार महिलांनी आवश्यक कागदपत्रासह आपले प्रस्ताव ऑनलाईन दाखल केले होते. महिला बालविकास विभागाच्या जिल्हास्तरावरून ३ लाख ७ हजार महिलांचे प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविले होते. या प्रस्तावाची शासनाकडून तपासणी केल्यानंतर त्यात जवळपास २९ हजार महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्याचे दिसून आले. ज्यामध्ये बहुतांशी महिलांनी आधार लिंक करूनही त्यांच्या खात्यावर रक्कम आलीच नाही. विशेष म्हणजे अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाल्याबाबतचा संदेश त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होऊन सुद्धा बँक व डाक विभागाच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. अनेक महिलांनी बँक व डाक विभागात अनेक चकरा मारूनही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात आलेच नाही. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली. या योजनेत अनेक महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. विशेष म्हणजे भाऊबीजपूर्वीही अनेक महिलांच्या बँक व डाक विभागातील खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याचे अनुदान जवळपास सव्वाशे कोटी रूपये जमा करण्यात आले.
एकीकडे बहुतांशी महिलांच्या बँक व डाक विभागाच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (CM Ladki Bahin Yojana) पैसे जमा झाले असताना २९ हजार महिलांपैकी बहुतांशी महिलांनी आधार लिंकीग करूनही त्यांची रक्कम जमा झाली नाही. येत्या तीन ते चार दिवसात विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे संकेत आहेत. त्यामुळे आचार संहिता लागल्यास या महिलांना रक्कम मिळणार नाही त्यामुळे महिलांची धागधूक वाढली आहे.
जिल्ह्यात २९ हजार महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापही जमा झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
जिल्हास्तरावर ताळमेळ लागेना
या योजनेत थेट राज्यस्तरावरून महिलांच्या बँक व डाक विभागातील खात्यात रक्कम जमा होत आहे. ज्या महिलांची रक्कम जमा झाली नाही. अशांनी कोणाकडे विचारणा करावी, असा संभ्रम निर्माण झाला आहे. ही योजना एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्याकडे हस्तांतरीत केली असली तरी कोणाचाच कोणाला ताळमेळ लागत नसल्याने २९ हजार महिला धास्तावल्या आहेत.