एका हाताने दीड हजाराची ओवाळणी देणाऱ्या भाऊरायाचा दुसरा ‘हात’ आखडता…
लातूर (CM Ladki Bahin Yojana) : एकीकडे तीन हजार रुपयांची ओवाळणी देताना दुसरीकडे ‘भाऊराया’ने ‘आनंदाच्या शिधा’साठी हात आखडता घेतल्याने लाडक्या बहिणीला गौरी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी कसरत करावी लागली. एकंदर ‘आनंदाचा शिधा’विना ‘लाडक्या बहिणी’च्या गौरींनी यंदा निरोप घेतला. (CM Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणीला दोन महिन्यांची तीन हजार रुपये ओवाळणी दिल्यानंतर राज्य सरकारचा आर्थिक डोलारा डगमगल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
मोठा गाजावाजा करून एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना गोत्यात आली आहे. गौरीचा सण होऊन गेला तरी आनंदाचा शिधा काही केल्या लोकांना मिळाला नाही. केवळ शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा ही योजना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने सुरू केली. दिवाळी, गुढी पाडवा, गौरी गणपती अशा सणानिमित्त या आनंदाच्या शिध्यातून गोडधोड करण्यासाठी चार-पाच चीजवस्तू देण्याचा ‘वस्तुपाठ’ वर्षभरापूर्वीपासून सरकारने घालून दिला होता. पण, यावेळी हा वस्तुपाठ सरकारने पाळलाच नाही. गौरी गणपतीच्या सणासाठी आनंदाचा शिधा (CM Ladki Bahin Yojana) अद्यापही गोरगरीब लोकांना मिळालाच नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून महायुतीचे सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) या योजनेच्या ‘मार्केटिंग’मध्ये गुंतले आहे. दरमहा दीड हजार रुपये महिलांसाठी सुरू केले, हे सांगण्यासाठी सरकार राज्यभरात विशेषतः महायुती आमदारांच्या कार्यक्षेत्रात महिला आनंद मेळावे घेत आहे. मात्र एकीकडे महिना दीड हजार रुपये दिले जात असताना दुसरीकडे 100 रुपयांचा आनंदाचा शिधा हे सरकार लाडक्या बहिणींना गौरीपूजनानिमित्त देऊ शकले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.
रवा कधी येईल? याकडे लागले डोळे…
लातूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात आनंदाचा शिधा लाभार्थी संख्या 4 लाख 3 हजार 25 आहे. या (CM Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना आनंदाच्या शिध्यात यावेळी फक्त चार वस्तू मिळणार आहेत. त्यात साखर, हरभरा डाळ, गोडेतेल आणि रवा यांचा समावेश राहणार आहे. मात्र सरकारने नेमलेल्या पुरवठा एजन्सी या वस्तूंपैकी केवळ तीनच वस्तू पुरवठा केल्या. त्यातही 1 लाख लाभार्थ्यांसाठी पुरेल इतकी हरभरा डाळ, 2 लाख 58 हजार 106 लाभार्थ्यांसाठी गोडेतेल तर 2 लाख 74 हजार 782 लाभार्थ्यांना पुरवठा होईल इतकीच साखर आहे. परिणामी किती लाभार्थ्यांना म्हणून हे तोकडे साहित्य वाटप करावे? हा पुरवठा विभागापुढचा प्रश्न असल्याने पुरवठा विभागाचे डोळे ‘रवा कधी येईल?,’ याकडे लागले आहेत.