7 ऑक्टोबरला नवामोंढा येथे हजारो महिलांची उपस्थिती राहणार
नांदेड (CM Ladki Bahin Yojana) : सोमवार 7 ऑक्टोबरला राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळावा नांदेड येथील नवीन मोंढा मैदानावर होत आहे. या (CM Ladki Bahin Yojana) मेळाव्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री तथा अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील अन्य मेळाव्यांपेक्षा वेगळा मेळावा व्हावा, यादृष्टिने प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून महिला सशक्तिकरण अभियानाची तयारी सुरु
यासाठी विविध समित्यांची नेमणूक आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून त्यासंदर्भातील आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या समित्यांच्या बैठका विभाग प्रमुखांनी आज पूर्ण केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आज या समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला असून सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी तसेच तालुकास्तरावरील यंत्रणेलाही या (CM Ladki Bahin Yojana) मेळाव्याच्या आयोजनातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरूवार 3 ऑक्टोंबरला यासंदर्भातील सर्व आढावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत घेणार आहेत.
नांदेड मध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
हा मेळावा यशस्वी करतांना जिल्ह्यातील कोणताही लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याचे नियोजन सुरू आहे. काही प्रातिनिधिक लाभार्थी थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे. नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ,महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जिल्हा प्रशासन या (CM Ladki Bahin Yojana) मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.