– जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (Collector Abhinav Goyal) : जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबरदरम्यान सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना ‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रमात तहसील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर पोहचविण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहीम, उपक्रम, महसूल अदालत आदि शिबिरांचे आयोजन करून त्या दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी दिले.
सुशासन सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विभागप्रमुखांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
सर्व विभागांनी 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान सुशासन सप्ताहात शासनाच्या सर्वच योजना गावपातळीवर प्रभावीपणे राबवाव्यात. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांशी योग्य समन्वय राखून ‘प्रशासन गॉव की ओर’ या उपक्रमांतर्गंत नवनवीन संकल्पना राबवाव्यात.
सर्व कार्यालय प्रमुखांनी 19 डिसेंबर रोजी नागरिकांची सनदीचे वाचन करायचे आहेत. दि. 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांनी सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या अनुषंगाने शिबिराचे आयोजन करावेत.
दि. 21 रोजीला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावकऱ्यांना द्यावी. दि. 22 रोजी अँग्री स्टँक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर शिबिराचे आयोजन करावे. दि. 23 रोजी शहर व ग्रामीण आवास योजनेची माहिती द्यावी. दि. 24 रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाने त्या विभागाच्या योजनांची शिबिरांच्या माध्यमातून माहिती द्यावी. नागरिकांची प्रलंबित प्रकरणे, तक्रारी, प्रश्न सोडविण्यात यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी यावेळी दिल्या.