संविधान सन्मान संविधान जागर यात्रेचा समापन
गोंदिया(Gondia):- गोंड गोवारी जात अस्तित्वात नसतांना त्याचे अस्तित्व दाखवणे समजण्यापलीकडे आहे, मी त्यावर अभ्यास केला. गोंदिया जिल्हा गोवारीबहुल आहे, गोवारींची परिस्थिती मला माहित आहे. मला कोणी कितीही विरोध केला तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही राहणार आहे. आपले हे दोन्ही उपक्रम समाजाला पोषक असून प्रबोधन करणारे आहे. मुख्यमंत्री(Chief Minister)फडणवीस यांच्याकडे समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रहात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू, असे प्रतिपादन गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
आदिवासी सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सांस्कृतिक भवन मरारटोली येथे आदिवासी गोवारी शहिद स्मारक समिती झिरो माईल नागपूर आणि आदिवासी गोवारी जमात संघटन समिती महाराष्ट्राच्या वतीने आदिवासी सेवा पुरस्कार वितरण सोहळा व संविधान सन्मान संविधान जागर यात्रेचा समापन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा समन्वयक शालिक नेवारे होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून गोंदियाचे आ.विनोद अग्रवाल, तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, मारोतराव वाघाडे (अमरावती), डेडुजी राऊत (गडचिरोली), देवराव पदिले (वर्धा), चिंतामन वाघाडे (नागपूर), सियाराम नेवारे (गोठणगाव), रविकुमार दुधकोर (यवतमाळ), घनश्याम भिमटे, अशोक काळसर्पे (वर्धा), नाना ठाकूर (गडचिरोली), भास्कर राऊत, वासुदेव ठाकरे (चंद्रपूर), राजु भोयर (अकोला), हेमंत आंबेडारे, नंदकिशोर कोहळे, रूपेश राऊत, रवि नेवारे, बळीराम राऊत, सोनुताई नेवारे, भास्कर राऊत, रामेश्वर शेंद्रे (वडसा) आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
तुम्ही कोणाला मतदान करावे हा तुमचा प्रश्न आहे, संविधानाने दिलेल्या अधिकाराची आपण पायमल्ली केली
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ.विजय रहांगडाले यांनी संत भाकरे महाराज स्मृती आदिवासी सेवा पुरस्कार सुरु केला ही गौरवाची बाब आहे, पुढच्या काळात हा शासकीय पुरस्कार व्हावा व त्याची कक्षा वाढवावी, मी प्रयत्न करणार. समाजात मतभेद असतात परंतु कटुता असू नये. निवडणूक काळात मी याचा अनुभव घेतला. तुम्ही कोणाला मतदान करावे हा तुमचा प्रश्न आहे, संविधानाने दिलेल्या अधिकाराची आपण पायमल्ली केली. प्रथमता आपल्या कार्यक्रमाला जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला, पण माझ्यासाठी तुम्ही मेहनत घेतली अजून थोडा प्रयत्न केला असता तर मी जास्त मताधिक्याने निवडून आलो असतो. आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी गोवारी समाजाच्या पाठिशी आहे, असे व्यक्त केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गोवारी समाजाच्या वाटचाल, समस्यांवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गोवारी समाजाच्या वाटचाल, समस्यांवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज संघटनेचे अध्यक्ष शालिक नेवारे यांनी केले. यावेळी आ.विनोद अग्रवाल व आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते राज्यस्तरीय संत भाकरे महाराज आदिवासी सेवा पुरस्काराने समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक देविदास भासकवरे यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त ११४ शहिद स्मृतिप्रित्यर्थ ११४ गावात संविधान सन्मान संविधान जागर यात्रा काढण्यात आली होती, यात्रेचा समापन करण्यात आला. यावेळी समाजातील मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले. तर कार्यक्रमात सहभागी झालेल्यांसाठी रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला होता. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संचालन व टेकचंद चौधरी व अनिल सहारे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर राऊत यांनी केले.