सेनगाव (Sand Mafia Case) : तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल आणि पोलिस विभाग एकत्रितपणे कारवाई करत असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रशासनाकडे अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार देणारा व्यक्तीच स्वतः अवैध वाळू वाहतुकीत सामील असल्याचे उघड झाले असून, या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलागर येथील काही नागरिकांनी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे अवैध वाळू वाहतुकीविषयी लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पुर्णा नदी पात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून चिखलागरमार्गे टिप्पर व ट्रॅक्टरने वाहतूक होत असल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे नमूद करण्यात आले होते.
या निवेदनावर चिखलागर येथील नागरिकांसोबत चक्क वाळू व्यवसायाशी निगडीत असलेल्या एका व्यक्तीने सही केली होती.यानंतर महसूल प्रशासनाने संबंधित भागात लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. ३१ ऑक्टोबर रोजी गौण खनिज पथकाने कारवाई करत सेनगाव परिसरात एक टिप्पर पकडला. त्या टिप्परमधून मोठ्या प्रमाणात वाळू आढळली, मात्र चालकाकडे कोणतेही वैध परवाने नव्हते. महसूल अधिकार्यांनी टिप्पर जप्त करून तो पोलिसांच्या ताब्यात दिला.
तपासादरम्यान उघडकीस आले की, जप्त करण्यात आलेल्या वाळु वाहतूकीत तोच व्यक्ती आहे ज्याने दोन दिवसां-पूर्वीच जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. म्हणजेच ‘तक्रारदारच वाळू माफिया’ असल्याचे स्पष्ट झाल्याच्या चर्चेचा उधाण आले आहे. या घटनेने महसूल व पोलिस विभाग दोघांनाही धक्का बसला असून, दोन्ही विभागांनी सखोल तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे. प्रशासनाकडे तक्रारी देत स्वतःच बेकायदेशीर धंद्यांत गुंतलेल्या व्यक्तींवर आता कडक कारवाई होण्याची चिन्हे आहेत. महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूचे मोजमाप, नमुने व पंचनामा करून अहवाल जिल्हा खनिज अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
दरम्यान, भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी अलीकडेच अवैध वाळू वाहतूक, व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार महसूल व पोलिस प्रशासनाने अवैध खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू केली असून, या घटनेनंतर तपास आणखी गती घेण्याची शक्यता आहे.
Sand Mafia Case: तक्रारदारच निघाला वाळू माफिया, अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश




