क्षेत्रीय अधिका-यांना दिले निर्देश
हिंगोली (Hingoli Heavy Rain) : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दुपारी डोंगरगाव पूल येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच क्षेत्रीय स्तरावरील जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील सर्वच मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पिके आणि घरांसह पशुधन तसेच जीवितहानी झाली आहे. त्यामुळे हे पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधितांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथे केली पाहणी
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे, कृषी अधिकारी घुगे, मंडल अधिकारी शिल्पा सरकटे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या महापुरामुळे शेतीचे आणि अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या ठिकाणी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी ही पाहणी केली. तसेच बाधित परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगून धीर दिला. यावेळी डोंगरगाव पूलचे उपसरपंच गजानन देशमुख, मंडळ अधिकारी आनंद काकडे, तलाठी विनोद ठाकरे, आर. डी गिरी, कृषी सहाय्यक घोंगडे आदी उपस्थित होते.




