हिंगोली (Hingoli):- जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ योजनेची अपूर्ण कामे शासनाच्या उद्दिष्टानुसार मार्च 2025 पर्यंत पूर्ण करुन ग्रामीण भागातील नागरिकांना 55 लीटर दरडोई दररोज शुध्द व शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आढावा बैठकीत दिल्या.
संस्था प्रतिनिधी यांनी कामे प्रगतीपथावर असताना वेळोवेळी भेटी देऊन दर्जा तपासणी करावी
जलजीवन मिशन(Jaljeevan Mission) कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा दि. 14 डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे(Water Supply Department) कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वॅपकॉस अंमलबजावणी संस्था, टाटा त्रयस्थ तांत्रिक तपासणी यंत्रणा इत्यादी विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गोयल पुढे म्हणाले, नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा योग्य दर्जा राखण्यासाठी त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्था प्रतिनिधी यांनी कामे प्रगतीपथावर असताना वेळोवेळी भेटी देऊन दर्जा तपासणी करावी. त्यासाठी अंमलबजावणी संस्था व सर्व शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय साधून प्रभावीपणे तपासण्या करुन घेण्याचे निर्देश दिले. नळ पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, परंतु विद्युत जोडणी अभावी योजना कार्यान्वित झाली नसल्यास त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी.
ज्या गावातील नळ पाणी पुरवठा योजनांचा उद्भव विहिरीला पाणी लागले नाही, अशा गावांच्या नवीन स्त्रोतांसाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत तात्काळ सर्वेक्षण करुन नवीन स्त्रोत उपलब्ध करुन घ्यावेत. जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले. जागेअभावी रखडलेल्या योजनांना जिल्हा परिषदेने तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. आवश्यक असलेल्या गावाची सुधारित अंदाजपत्रके तयार करुन शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने त्यांच्याकडील कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले