निलंगा (Latur) :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत जायला काँग्रेस (Congress) पक्षाने मदत केल्याचा खोटा इतिहास काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आजच्या तरुण पिढीला सांगत आहेत, असा आरोप करीत काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना संविधान सभेत जायला विरोध केला होता. तसेच बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठीही काँग्रेस पक्षानेच रणनीती आखली होती. म्हणून बाबासाहेबांनी पश्चिम बंगालच्या बारिशाल या मतदार संघातून निवडणूक लढून संविधान सभेवर निवडून आले होते. परंतु तो मतदार संघच फाळणीनंतर काँग्रेसने पाकिस्तानला देऊन टाकला, असे स्पष्ट प्रतिपादन ऑल इंडिया बुध्दीष्ट सोसायटीचे (All India Buddhist Society) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.
डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे ठोस प्रतिपादन
निलंगा येथे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित संविधान सन्मान सभेत ते बोलत होते. याप्रसंगी पूज्य भदंत धम्मसार थेरो, पूज्य भंते सुमेधजी नागसेन यांच्यासह भिक्खू गणांची विशेष उपस्थिती होती. या संविधान सन्मान सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ समाजसेवक लिंबन महाराज रेशमे, जि.प.लातूरचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, भारत किर्तीमान पुरस्कार प्राप्त डॉ.शाम लोकरे,जेष्ठ विधिज्ञ जगदीश (दादा) सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, पंकज शेळके, लाला पटेल वंचीतच्या सौ. मंजुषाताई निंबाळकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या कलमांची संख्या कमी होत चालली आहे
सद्यस्थितीत बाबासाहेबांनी लिहिलेल्या कलमांची संख्या कमी होत चालली आहे. काही कलम हे फक्त संविधानातच शिल्लक आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे मागास प्रवर्गातील हक्काचे शिक्षण संपुष्टात आलेले आहे, अशी चिंता डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, बौद्धांची खरी प्रगती ही आरक्षणाने नाही तर बुद्धांच्या तत्वज्ञामुळे झालेली आहे. यापुढेही बौद्धांची प्रगती करायची असेल तर बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे त्यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने निर्माण करीत असलेल्या बँकेचे सभासद होण्याचे आवाहनही त्यांनी केले.