मुंबई(Mumbai):- जळगाव येथील मेहरुण परिसरात होऊ घातलेले अतिरिक्त विभागीय क्रीडा संकुलाचे(Divisional Sports Complex) बांधकाम सुरू होण्यास आणखी काही अवधी लागणार आहे. या संदर्भातील प्रश्न आज आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना सरकार तर्फे सदर विभागीय क्रीडा संकुल प्रकल्पाला ‘ मे ‘ महिन्यात तांत्रिक मान्यता मिळाल्याने सांगण्यात आले.
विभागीय क्रीडा संकुलासाठी 240.54 कोटी रुपये खर्च होणार
मेहरूण ता. जि. जळगाव येथील प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलासाठी 240.54 कोटी रुपये खर्च होणार आहेत. सप्टेंबर 2023 मधे मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची वास्तू विशारद शशिप्रभू अँड असोसिएट मुंबई यांची नोव्हेंबर 2023 मधे नियुक्ती (appointment) करण्यात आली. तब्बल 10 महिन्यापूर्वी मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाच्या बांधकामाचा प्रवास सध्या तांत्रिक मान्यता मिळणे पर्यंत येऊन थांबला आहे. आता हा प्रस्ताव शासनाच्या हाय पॉवर कमेटिकडे(High Power Committee) जाणार असून त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी सभागृहाला दिली. यावर प्रतिप्रश्न विचारताना सदस्य तांबे यांनी प्रकल्प सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे प्रकल्पाची मूळ किंमत वाढते, असे म्हणून नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना मंत्री भुसे यांनी लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.