परभणी (Parbhani) :- बांधकाम कामगार योजनेंतर्गत मिळत असलेला लाभ पाहता गाव स्तरावरील कामगार नसणारे नागरिकसुध्दा या योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांना प्रमाणपत्र (Certificate) मागत आहे. ग्रामपंचायत स्तरावर कामगारांच्या कामाच्या नोंदीचा कुठलाच दस्तावेज नाही. गावात काम करणार्यांची संख्या नगण्य आहे. अशातच प्रत्येक जण प्रमाणपत्र मागत असल्याने ग्रामसेवकांना अडचणी निर्माण होत असल्याने गाव स्तरावर वादंग निर्माण होत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस नोंदणी होण्याची शक्यता
शहरी भागात खाजगी बिल्डर, शासकीय कंत्राटदाराकडे कार्यरत कामगारांना पालिका स्तरावरुन कंत्राटदाराकडे असलेल्या नोंदणीचा आधार घेत कामगार असल्याचे प्रमाणपत्र दिल्या जाते. ग्रामीण स्तरावर कामगार प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. एखादा गावात मिस्त्री काम करणारे क्वचितच कामगार आहेत. या योजनेच्या लाभासाठी गावातील प्रत्येक जण ग्रामसेवकास कामगार असल्याचा दाखला मागत आहे. त्यामुळे ग्रामसेवक नियमाप्रमाणे दाखला देण्याकरिता नकार देत आहे. कारण गावातील प्रत्येक नागरिक बांधकाम कामगार कसा ठरवावा ? असा प्रश्न ही ग्रामसेवकांना निर्माण होत आहे.
कामगारांना या योजनेंतर्गत मिळत असलेली पेटी, भांडे व इतर लाभ आपल्यालाही मिळावे, यासाठी गावातील प्रत्येक जण हा दाखला मिळविण्यासाठी ग्रामसेवकाला आग्रह करत आहे. त्यामुळे कामगार प्रमाणपत्र वादंग निर्माण करणारे ठरत आहे.