अर्जुनी मोरगाव (Action of Bribery Department) : घरकूल लाभार्थ्यांचे अनुदानाचे अडकलेले देयक काढून देण्यासाठी लाच मागणारा कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या वतीने आज (ता.१२) सायंकाळी ५ वाजता सुमारास पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली. अनिल धर्मराज मेश्राम असे लाचखोर अभियंताचे नाव आहे.
यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत ग्राम पंचायत मोरगाव येथील लाभार्थ्यांला घरकूल मंजूर झाले. घरकुलासाठी शासनाकडून १ लाख ३१ हजार रूपयाचे अनुदान मंजूर झाल्याने लाभार्थ्याने घरकूल बांधकामाला सुरूवात केली. दरम्यान लाभार्थ्यांने शेवटच्या अनुदानाची मागणी केली. मात्र पंचायत समिती घरकुल विभागात कार्यरत कंत्राटी अभियंता अनिल धर्मराज मेश्राम याने देयक काढून देण्यासाठी लाभार्थ्याला ७ हजाराची लाच मागितली.
लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाभार्थ्यांने लाचलुचत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहनिशा करून विभागाने पंचायत समितीत आज, सायंकाळी ५ वाजता सुमारास सापळा रचून लाचखोर अभियंताला अडकविले. या कारवाईने पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.