लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Anti-Bribery Department) : महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कंत्राटी डेटा इंट्री संगणक चालकास मंगळवारी १० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department) पथकाने हिंगोलीत रंगेहात पकडले.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, एका व्यक्तीची आई व चुलत मामा हे बांधकाम कामगार मजुर म्हणून काम करत होते. त्यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हिंगोली येथे नोंदणी केलेली होती. बांधकाम मजुर मृत्यू पावल्यानंतर त्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयाकडून विमा मंजूर होतो. तक्रारदाराची आई व मामाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या आईचा ५ मे व चुलत मामाचा एप्रिल २०२५ रोजी या कार्यालयाकडे विमा (क्लेम) मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले होते.
यासाठी त्यांनी २२ सप्टेंबरला कार्यालयातील कंत्राटी डेटा इंट्री ऑपरेटर गोविंद संभाजी दहिफळे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदारास माझी व साहेबांची ओळख आहे तुझे काम करून देतो त्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागेल अशी मागणी केली. त्यामुळे (Anti-Bribery Department) तक्रारदाराने २२ सप्टेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. त्याची पडताळणी देखील केली असता दोन्ही प्रकरणात ५० हजार रुपये देवून टाक अशी मागणी दहिफळे यांनी केली. त्यापैकी २३ सप्टेंबरला १० हजार रुपये व उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर स्विकारण्यास दहिफळे यांनी सहमती दर्शविली. यावरून २३ सप्टेंबरला हिंगोलीतील तापडिया इस्टेट भागातील संजीवणी बाल रुग्णालया समोरील रस्त्यावर तक्रारदाराने गोविंद दहिफळे यांना १० हजार रुपये देताना रंगेहात पकडले.
तपास अधिकारी पोलिस उपाधिक्षक विकास घनवट यांच्यासह सापळा पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक युनूस शेख तसेच विजय शुक्ला, भगवान मंडलीक, गजानन पवार, रविंद्र वरणे, पुंडगे, वाघ, जाधव, शेख अकबर आदींचा पथकामध्ये समावेश होता. या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात दहिफळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




