मानोरा(Manora):- तालुक्यात काही ग्राम पंचायत स्तरावर विविध विकास कामासाठी राजकीय कार्यकर्ते ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्यात टक्केवारीचे प्रमाण वाढले आहेत. अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला (Corruption) वाव दिला जात आहे. जनतेने निवडून दिलेले राजकारणी ठेकेदार म्हणून काम करीत असतील तर निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चीत रकमेची एकप्रकारे जनतेकडून अप्रत्यक्षपणे वसूली म्हणता येईल. विकासाच्या नावाखाली शासनाचे पर्यायाने जनतेचा लाखो रुपयांचा निधी राजकारणाच्या(politics) घशात जात असल्याची ओरड जनतेतून होत आहे.
गल्ली बोळातील राजकारणी ठेकेदार झाले
शहरी व ग्रामीण भागातील जन सामान्य शेतकरी(Farmer), शेतमजुर, बेरोजगारांचे जीवनमान उंचावून परिस्थितीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने तसेच ग्राम विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जात आहे. जनतेचा लाखो रुपयांचा निधी शासन निर्देशाने जिल्हा परिषदेचे बहुतांश अधिकार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायतला दिले आहेत. त्यामुळे गल्ली बोळातील राजकारणी ठेकेदार झाले आहेत. ग्रामसेवक, यांच्याशी हात मिळवणी शासनाच्या नियमाला बगल देत निकृष्ट दर्जाचे विकास काम करून मलिदा लाटण्याचे प्रकार पाहावयास मिळत आहे, तसेच काही अधिकाऱ्यांशी चिरीमिरीचे व्यवहार साधून शौच खड्डे(Defecation pits), बांधकामे, दुरुस्ती आणि इतर कामात दर्जाहीन कामे अधिक नफा लाटण्यासाठी राजकारणी सरसावले आहेत.
निकृष्ट कामाचे प्रमाण वाढले
ग्राम विकासाच्या नावाखाली भ्रष्ट व्यवहाराला उधाण आल्याने दर्जेदार कामापेक्षा निकृष्ट कामाचे(Poor job) प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाच्या कामाला तिलांजली तर मनमर्जीच्या कामांना प्राधान्य ही पद्धत रूढ झाली आहे. राजकारण्यांची टक्केवारी वाढली आहे. या कामावर देखरेख करणारे अथवा प्रत्यक्ष कामे करून घेणारे अभियंता तर गायब असल्याचे दिसत आहे. विकास कामे सुरू असताना अभियंता ढुंकूनही कामावर येऊन पाहत नसल्यामुळे विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे चित्र दिसत आहे.
हातमिळवणी साठी खास माणसाची निवड
पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत (Grampanchayat)स्तरावर काही गावामध्ये शासनाच्या योजनेतून अथवा स्थानिक फंडातून होणारे इमारतीची रंगरंगोटी, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, सौंदर्यीकरण, इमारत बांधकाम, नाला सरळीकरण, शौच खड्डे अन्य कामासाठी राजकारणी आणि अधिकारी, कर्मचारी यांची हातमिळवणी असते. यासाठी पंचायत समिती कार्यालय व कार्यालयाबाहेर खास मर्जीतील माणसाची निवड असल्यानेच भ्रष्ट्राचार फोफावला असल्याचे बोलले जात आहे