मानोरा(Washim):- सामायिक क्षेत्र असलेल्या मागील वर्षीचे कापूस व सोयाबीनचे शासनाचे अर्थसहाय्य सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे सदर अनुदान तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी(Agricultural Officer) यांना आसोला खुर्द येथील शेतकरी शेखर राठोड व बादल जाधव दिले आहे.
शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर केले
निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शासनाने कपाशी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर केले होते. सदरील अनुदान सामायिक शेती नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्यावेळीच जमा झाले आहे. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना तहसिलदार यांनी सुचविल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाचे अनुदान मिलाण्यासंदर्भात निकष पूर्ण केले आहे. तरी सुध्दा शासनाचे अर्थसहाय्य अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान खात्यात थेट जमा करण्याचे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे.