वातावरणातील बदलामुळे कापसाला धोका
परभणी (Cotton Crop) : यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड (Cotton Crop) करण्यात आली असून वातावरण बदलामुळे पांढरी माशी, तुडतुडे,गुलाबी बोंडअळी किडीचा प्रार्दुभाव होत असल्याने त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
कमी अधिकपाऊस, उष्ण व दमट हवामान, कमी सूर्यप्रकाशाचा दीर्घकाळ यामुळे कपाशीवर गुलाबी बोंडअळी पडते. यामध्ये फुले आणि हिरव्या बोंडांचे नुकसान होते. अर्धवट उमललेली फुले गुलाबाच्या कळीसारखे दिसतात त्यांना डोमअळी म्हणतात. (Cotton Crop) बोंड तयार झाल्यानंतर वरून ही अळी दिसत सुद्धा नाही व शेवटी बोंडे परिपक्व न होताच फुटतात. तर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या प्रादुर्भावामुळे पानांचे नुकसान होते. पांढरी माशीचा प्रादुर्भाव हा साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात आढळतो. यामध्ये पानाच्या खालच्या भागात राहून पानाचे रसग्रहण करत शोषण होते. त्यामुळे पाने कोमेजण्याबरोबर मलूल होऊन लालसर व ठिसूळ बनतात. माशी शरीरातून पानावर चिकट पदार्थ टाकते त्यामुळे पानावर बुरशी वाढून अन्न बनविण्याची प्रक्रिया थांबते.
यावरील विविध किडीच्या व्यवस्थापना करिता डायफेन्थ्युरॉन ५० टक्के – २४० ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्सिफेन १० टक्के – २०० मिली प्रती एकर फवारावे तर गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेंजोएट ५ टक्के – ८८ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५टक्के -४०० मिली प्रती एकर फवारावे. या शिवाय कापसावर दहिया नावाचा रोग हा साधारणत: ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान कमी तापमान आणि रात्रीच्या उच्च आद्रतेमुळे पडतो. ढगाळ वातावरण आणि अधून मधून पडणारा पाऊस या रोगासाठी पोषक असतो. यामुळे पानावर बुरशी तयार होते. तर शेतातील वाढलेली आद्रता आणि घटलेल्या तापमानामुळे आंतरिक व बाह्य बोंडसड दिसून येते. त्याकरिता कार्बेन्डाझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के डब्ल्यू.पी. संयुक्त बुरशीनाशक, ५०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यू.पी., २०० ग्रॅम किंवा मेटीराम ५५ टक्के अधिक पायराक्लोस्ट्रोबिन ५ टक्के डब्ल्यू.जी., ४०० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के ई.सी., २०० मि.लि. प्रति एकर या प्रमाणात आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून दुसरी फवारणी करणे आवश्यक आहे.
शेतकर्यांनी कापुस, तुरीचे किडी पासून व्यवस्थापन करावे
तुरीमध्ये पाने गुंडाळणारी व पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा कुणाल फास्ट २५ टक्के ४०० मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच फायटोप्थेरा मर या रोगाचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरणात व जमिनीत सतत ओल असल्यास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्याकरिता शेतकर्यांनी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची आळवणी करावी.
– डॉ.दिगंबर पटाईत, सहाय्यक किटक शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी