सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील घटना
हिंगोली (farmer Suicide) : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे कपाशीच्या बियाणाचा प्लॉट खराब झाल्याने मानसिक तणावातून एका (farmer Suicide) शेतकर्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शेतकर्यावर कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत सापडले असताना अधुनमधून शासनाकडूनही आर्थिक मदतीकरीता शेतकर्यांची क्रुर चेष्टा केली जाते.
सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील विठ्ठल दत्तराव तांबिले (३८) या शेतकर्याला वाघजाळी शिवारामध्ये २० गुंठ्ठे शेती असून शेतीवरच त्यांच्या कुटुंबियांची उपजिवीका भागविली जाते. प्रत्येक वर्षी शेतीमध्ये नेहमीचे उत्पन्न घेत असताना त्यात काही वेगळा बदल करण्याचा मनोदय तांबिले यांच्या मनामध्ये आल्याने त्यांनी यावर्षी कपाशीच्या बियाणाचा प्लॉट घेतला होता. शेतामध्ये कपाशीचे बियाणे उत्पादनासाठी त्यांनी एका कंपनी सोबत चर्चा केल्यानंतर त्याप्रमाणे बियाणे देखील उपलब्ध केले होते. शेतामध्ये कपाशीचे बियाणे लावले; परंतु कपाशी खराब झाल्याने पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची भिती त्यांच्या मनात आल्याने मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ होते. सिड प्लॉट खराब झाल्याने पैसे कसे उभे करावे व आपल्या कुटुंबियाची उपजिवीका कशी भागवावी, अशी चिंता त्यांच्या मनात सतत भेडसावत होती.
शेतामध्ये नेहमीच रोही प्राणी येत असल्याने त्यांना हाकलण्यासाठी शेतात जातो असे म्हणून १७ ऑगस्टला ते घरातून बाहेर पडले होते. उशिरापर्यंत घरी आले नाही. कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर विठ्ठल तांबिले यांचा मृतदेह कहाकर बु. शेत शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षी वेगळा प्रयोग करावयाचा या हेतूने विठ्ठल तांबिले याने शेतात कपाशीच्या बियाणाचा प्लॉट घेतला होता; परंतु कपाशी खराब झाल्याने मानसिक तणावात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबावर कोसळले संकट वाघजाळी येथील विठ्ठल तांबिले हे घरातील कते-धर्ते पुरूष होते. त्यांनी मानसिक तणावातून (farmer Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
गळफास घेऊन आत्महत्या (farmer Suicide) केल्याची घटना घडल्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेप्रकरणी सपोउपनि शेषराव राठोड, जमादार किसन डवरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी गोरेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नारायण तांबिले यांच्या माहितीवरून १८ ऑगस्टला आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.