आई सतत खोटे बोलत असल्याच्या रागातून कृत्य केल्याचा प्राथमिक आरोप; नवसारी रिंग रोडवरील अपार्टमेंटमध्ये घटना, गाडगेनगर पोलिसांकडून आरोपीला अटक
अमरावती शहरात आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आई खोटे बोलत असल्याच्या रागातून एका इंजिनिअर तरुणाने तिची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा आईच्या मृतदेहाजवळ खुर्चीवर बसून राहिला. शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
या घटनेत रंजना सतीश कानफाडे (वय ६५) यांचा मृत्यू झाला असून, तुषार सतीश कानफाडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. अमरावतीतील नवसारी रिंग रोड परिसरातील गजानन प्लाझा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार हा पुण्यातील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतो. सध्या तो वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरातूनच काम करत होता. तुषार आणि त्याची आई रंजना कानफाडे हे दोघेच घरात राहत होते.
आई सतत खोटे बोलत असल्याच्या कारणावरून तुषारने तिचा गळा दाबून जीव घेतल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली आहे. मात्र, या घटनेमागे याशिवाय अन्य काही कारण होते का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हत्येनंतर मृतदेहाजवळच बसून राहिला आरोपी
आईची हत्या केल्यानंतर तुषार घराबाहेर न जाता तिच्या मृतदेहाशेजारीच खुर्चीवर बसून राहिल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली आणि तुषारला ताब्यात घेतले.
या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तुषार सतीश कानफाडे याला अटक केली आहे. आईच्या हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी आणि इतर संभाव्य कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.