अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरण

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी वयोवृध्द आरोपीला पाच वर्षे कारावास व १५ हजाराचा दंड

Minor Girl Abuse Case: सेनगाव तालुक्यातील एका गावामधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ३ नोव्हेंबर मंगळवार रोजी दोषी ठरलेल्या वयोवृध्द आरोपीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश हिंगोली  एस.एल.आणेकर यांनी...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी वयोवृध्द आरोपीला पाच वर्षे कारावास व १५ हजाराचा दंड

Minor Girl Abuse Case

 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एल.आणेकर यांचा निर्णय

हिंगोली (Minor Girl Abuse Case) : सेनगाव तालुक्यातील एका गावामधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ३ नोव्हेंबर मंगळवार रोजी दोषी ठरलेल्या वयोवृध्द आरोपीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश हिंगोली  एस.एल.आणेकर यांनी पाच वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या संदर्भात जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. नारायण मुटकुळे यांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीने पोलीस स्टेशन गोरेगाव येथे २ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार १ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास तिची ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या भावासोबत घरासमोरील अंगणात बसली असताना तिला तुरीच्या खोडक्या गोळा करण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्या मालकीच्या गोठ्यात घेऊन जाऊन तिच्याशी गैरवर्तन केले होते व ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन गोरेगाव येथे कलम ३५४ (अ), ५०६ भादंवि व सहकलम ८,१२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर प्रकरणी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जी.एस.पाटील यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय हिंगोली येथे विशेष खटला दाखल करण्यात आले होते. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश हिंगोली  एस.एल. आणेकर यांनी आरोपीस दोषी ठरवत कलम ३५४ (अ) भादंवि मध्ये पाच वर्षे कारावास, सहकलम ११ पोक्सो तसेच कलम १० पोक्सो अंतर्गत पाच वर्षे कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने कारावास अशी शिक्षा दिली. कलम ३५४(अ) भादंवि व कलम ११ पोक्सो मधील वेगळी शिक्षा भोगण्याची आवश्यकता नसल्याचे  न्यायालयाने आदेश दिले आहेत.

सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील  एन.एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील श्रीमती सविता एस. देशमुख (जाधव) यांनी एकूण ५ साक्षीदार तपासले तसेच अंतिम युक्तिवाद सादर केला. त्यामध्ये पिडीत मुलीची साक्ष, फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सदर प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील एस.डी.कुटे व अ‍ॅड. रजत देशमुख यांनी सरकारी पक्षास सहाय्य केले. तसेच कोर्ट पैरवी धम्मपाल लोनकर, पोलीस नाईक, पो.स्टे. गोरेगाव यांनी सहकार्य केले.