परभणी शहरातील फरीद कॉलनी येथील घटना कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल...!
परभणी (Parbhani murder case) : तु नेहमीच जोर जोराने शिवीगाळ का करतोस, आमच्या घरात आई, बहिणी आहेत, असे म्हणत राग मनात धरुन युवकाला घराबाहेर नेत चाकुने भोसकण्यात आले. गुप्त भागाच्या जबर वार झाल्याने युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना २ नोव्हेंबरच्या रात्री पावणे बाराच्या सुमारास गंगाखेड रोडवरील फरीद कॉलनी भागात घडली. सदर प्रकरणी चौघांवर कोतवाली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमा खान यांनी तक्रार दिली आहे.
इरफान खान हबीब खान वय ३१ वर्ष, असे मयताचे नाव आहे. फिर्यादीचा मुलगा २ नोव्हेंबरच्या रात्री साडे अकराच्या सुमारास कामावरुन घरी आला. (Parbhani murder case) इरफान याने गरमी होत आहे, कुलर लावा असे म्हणाल्यावर कुलरचे पाते तुटले आहेत, कुलर लावता येणार नाही, असे उत्तर फिर्यादीने दिले. त्यानंतर इरफानने रागात वडिलांना शिवीगाळ सुरू केली. ही शिवीगाळ ऐकून बाजूला राहणारे घर मालक शेख लतीफ, शेख एजाज, शेख साबेर, शेख बब्बु आले. त्यांनी इरफानला तु नेहमीच जोरजोरात शिवीगाळ करतो, आमच्या घरात आई - बहिणी आहेत, असे म्हणत मारहाण केली. त्याच्या मानेला धरुन घराबाहेर नेले आणि धारदार चाकुने वार केले.
गुप्त भागाच्या ठिकाणी चाकुचा वर्मी वार लागल्याने जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणाहून त्याला परभणीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ३ नोव्हेंबरच्या पहाटे साडे चारच्या सुमारास इरफानचा मृत्यू झाला. चाकुने भोसकून त्याचा खून केल्या प्रकरणी शेख लतीफ शेख यासीन, शेख एजाज शेख लतीफ, शेख साबेर शेख लतीफ, शेख बब्बु शेख लतीफ यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.