शेतकऱ्यांचे उन्हाळी पिके पाण्यात!
परभणी (Crops Damage) : 5 मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं पाथरी तालुक्यात अक्षरशः थैमान घातलं आहे. पावसाचं प्रमाण एवढं वाढलं की, पूर्वमोसमी पावसाचं रूप घेत आता थेट मोसमी पावसानेही तालुक्यात हजेरी लावली आहे. या सलग २२ ते २३ दिवसांमध्ये वादळी वारे , पावसामुळे तालुक्यातली शेती धुवून गेली असून, शेतकरी (Farmer) वर्ग धास्तावलेला आहे. उन्हाळी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून एकिकडे खरिपासाठी शेती तयार नसताना शेतकरी आर्थिक अडचणीतही (Financial Difficulty) सापडला आहे.
जनावरांना चारा देण्याचीही पंचाईत झाली, भुईमुगाची अवस्था तर आणखी बिकट!
बांदरवाडा येथील शेतकरी दिगंबर त्रिंबक वाघमारे आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांच्याकडे बोरगव्हाण शिवारात चार एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर भुईमूग, एक एकर बाजरी तर एक एकर कांदा (Onion) लावला होता. कांद्याची काढणी करून जवळपास 150 गोणी कांदा शेतात साठवलेला होता. हा कांदा लवकरच गोणीत भरून बाजारात विकण्याचा विचार होता. परंतु अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) तो सगळा कांदा चिखलात गेला. सरासरी दराने प्रत्येक गोणीची किंमत 500 धरल्यास किमान 75 हजार रुपयांचे नुकसान झालं. बाजरीचे पिकही चांगलं आलं होतं, पण काढणी केल्यानंतर चारा (कड) सुकायला ठेवलेला असताना पावसात भिजून गेला. त्यामुळे जनावरांना चारा देण्याचीही पंचाईत झाली आहे. भुईमुगाची अवस्था तर आणखी बिकट आहे. सततच्या पावसामुळे शेंगातुन अंकुर फुटले असून, उत्पादन शून्य झालं आहे. यामुळं खरिपासाठी देखील जमीन योग्य राहिलेली नाही, असं वाघमारे सांगतात.
सरासरी एका हेक्टरला 50 हजार इतकं उत्पादन मानलं, तर एकूण अंदाजे 2 कोटींपर्यंत नुकसान!
कासापुरी (Kasapuri) येथील केशव आरडे या शेतकऱ्याच्या शेतात एक एकर भुईमूग (Groundnut) लावलेला होता. पिक काढणीसाठी तयार झालं होतं, पण अवकाळी पावसामुळे शेतातच उभं राहिलं. जमिनीतल्या ओलाव्यामुळे शेंगांमध्ये अंकुर फुटल्याने संपूर्ण प्लॉट हातचा गेला आहे. अंदाजे 30 ते 35 हजाराचे चे नुकसान झालं आहे. सिंचनाची सुविधा (Irrigation Facility) व जायकवाडीतुन कॅनॉल द्वारे पाणी आर्वतन सुटल्याने पाथरी तालुक्यात अंदाजे 1 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. त्यात भुईमूग, बाजरी, कांदा, मका, भाजीपाला अशा पिकांचा समावेश आहे. सध्या पर्यंत 400 ते 500 हेक्टर क्षेत्रावर पिकांचं मोठं नुकसान (Damage Crops) झालं आहे. सरासरी एका हेक्टरला 50 हजार इतकं उत्पादन मानलं, तर एकूण अंदाजे 2 कोटींपर्यंत नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी!
पावसामुळे शेतजमीन ओलसर राहिल्याने खरिपाची मशागतही (Kharif Cultivation) रखडली आहे. अनेक ठिकाणी बैलजोड्या घेऊन शेतात उतरता येत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय व कृषी विभागाकडे (Department of Agriculture) तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
– 5 मे पासून सलग वादळीवारे व पाऊस
– केळीपिकाचे ही नुकसान
– 400 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांचे नुकसान
– भुईमुगात अंकुर फुटून उत्पादन शून्यावर
– खरिपासाठी मशागत रखडली
– शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची जोरदार मागणी




