नागपूर(Nagpur):- माजी महापौर डॉ. रविंद्र ऊर्फ छोटू भोयर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुनम अर्बन क्रेडिट सोसायटीचे संचालक असतांना ३.४१ कोटींचा घोटाळा (Fraud) केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच त्यांना अटक केली आहे. यासह त्यांनी इतरांच्या संगणमताने ८९ बोगस कर्ज प्रकरणे मंजूर केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
विदेशात राहणाऱ्यांच्या नावाचा कर्ज मंजुरीसाठी गैरवापर
यासाठी विदेशात राहणाऱ्या काही नागरिकांच्या नावाचाही त्यांनी गैरवापर केल्याचा खळबळजनक आरोप सोसायटीचे वर्तमान अध्यक्ष अॅड. रमन सेनाड यांनी केला आहे. यासंदर्भात पूनम अर्बन सोसायटीचे वर्तमान अध्यक्ष अॅड. सेनाड यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यासह पोलिस उपायुक्त व राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली होती. त्यामुळे २०१९ पर्यंतच्या कार्यकाळातील घोटाळाप्रकरणी दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर आता वर्ष २०१० ते २०२२ या कालावधीत झालेल्या घोटाळ्याचाही आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास (Investigation) सुरू केल्याची चर्चा आहे. अॅड. सेनाड यांच्या तक्रारीनुसार, वर्ष २०१० ते २०२२ दरम्यान सोसायटीमध्ये मोठा अर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले.
छोटू भोयरसह १२ जणांवर पोलिसांनी आवळला फास
वर्ष २०११ ते २०१३ दरम्यान ८९ जणांच्या नावाचा व बनावट कागदपत्रांचा गैरवापर करीत बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले. यासर्व कर्ज प्रकरणाची रकम धनादेशाऐवजी रोख स्वरुपात त्रयस्त अशा प्रसाद अग्निहोत्री नावाच्या एकाच व्यक्तीकडे दिली. यामध्ये विदेशात राहणाऱ्या काही व्यक्तीला नागपुरातील रहिवासी दाखवून त्यांच्या नावाचा गैरवापर करीत कर्ज प्रकरणे मंजूर केले. आरोपी भोयर आणि कंपनीने एका ३ कोटी १५ लाखाच्या कर्ज प्रकरणात वाडीतील गजानन दिव्य अपार्टमेंटमधील गहान असलेल्या ४ सदनिकांपैकी ३ सदनिका शासकीय परवानगी न घेता परस्पर विकले. विक्रीनंतर आलेली रकमही सोसायटीकडे जमा केली नाही. यासह वर्ष २०१२ पासून सोसायटीची आर्थिक स्थिती हलाकीची असूनही शासकीय परवानगी न घेता कमी किंमतीची शेत जमीन एका मध्यस्थामार्फत मूळ मालकाकडून चढ्या २ कोटी ५० लाखात विकत घेतली.
मध्यस्थी व्यक्तीमार्फत ती लंपास करून शेत मालकाची फसवणूक
शेती विक्रीपोटीची रक्कम नदेता मध्यस्थी व्यक्तीमार्फत ती लंपास करून शेत मालकाची फसवणूक केली. कर्जप्रकरणे मंजूर करण्यापूर्वी कर्जदारांची आर्थिक पत लक्षात घेतली नाही. तसेच गहान मालमत्तेचे बाजारमूल्य कमी असतांना गैरकायदेशीररित्या फुगवून दाखविले. कर्जदारांसह गॅरंटी घेणाऱ्या व्यक्तीच्या निवासाची मौका चौकशी केली नाही. नियमबाह्यरित्या अनेक गृहकर्ज प्रकरणेही मंजूर केले. त्यांच्याकडून कर्जाची रक्कम परस्पर वसूल करून सोसायटीकडे जमा न करता लंपास केली, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अॅड. रतन सेनाड यांनी तक्रारीद्वारे केला आहे.