उदगीर (Latur):- दीड लाख रुपयांची तूर विकून आपल्या गावी त्या तुरीचे पैसे घेऊन निघालेल्या शेतकऱ्याचा खिसा चोरट्यांनी कापला. उदगीर बसस्थानकात रविवारी बसमध्ये चढताना चाकूर तालुक्यातील बोथीच्या शेतकऱ्याला चोरट्यांनी लुटले. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) नोंद झाला आहे.
दीड लाख रुपये लांबविले
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बोथी येथील शेतकरी महालिंग शंकर अक्कानवरू आपल्या शेतीतील तूर घेऊन उदगीरच्या मोंढ्यातील एका आडत दुकानात आला. या शेतकऱ्याने तुरीचे माप झाल्यानंतर त्या तुरीची आलेली पट्टी अर्थात् रक्कम रविवारी 1 लाख 39 हजार 850 रुपये आपल्या बँकेच्या उजव्या खिशात ठेवून तो गावी जाण्यासाठी उदगीरच्या बस स्थानकावर आला. मात्र उदगीरच्या बस स्थानकात (Bustand)आल्यानंतर बसमध्ये चढताना चोरट्यांनी त्यांच्या खिशातून ही रक्कम चोरून नेली. याबाबत शेतकरी महालिंग शंकर अक्कानवरू (रा. बोथी ता. चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अधिक तपास फौजदार पाटील करीत आहेत.