परभणी (Parbhani):- वसमत रोडवर शिवशक्ती बिल्डींग समोर असलेल्या वडापावच्या गाडीला लागलेल्या आगीमध्ये दोन गॅस सिलेंडरचा (Gas cylinder) स्फोट झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. सदर घटनेचा तपास करत असताना खोडसाळपणे दोन व्यक्तींनी वडापावच्या गाडीला आग लावल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तींनी सदर कृत्य का केले हे मात्र समजु शकले नाही.
वडापावच्या गाडीला लागलेल्या आगीमध्ये दोन गॅस सिलेंडरचा स्फोट
वडापावची गाडी पेटविण्याचा खोडसाळपणा परभणीकरांच्या जीवावर बेतला असता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर प्रकरणी रविवार १२ जानेवारी रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
रवि मोरे यांनी या बाबत तक्रार दिली आहे. फिर्यादीचे वसमत रोडवर मातोश्री वडापाव या नावाचा हातगाडा आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी ज्वलनशील पदार्थ टाकत वडापावच्या गाड्याला पेटवून दिले. यामध्ये सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. वडापावच्या गाड्यातील दोन गॅस सिलेंडरचा एकापाठोपाठ स्फोट (explosion) झाला.
या घटनेमुळे वसमत रोड हादरला. सदर प्रकरणी दोन अज्ञातांवर नवा मोंढा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नेमका या इसमांनी हातगाडा का पेटवून दिला हे सदर इसमांना ताब्यात घेतल्यानंतरच पुढे येईल. वसमत रोडवरील सीसीटिव्ही खंगाळले जात आहेत. नवा मोंढा पोलीस अधिक तपास करत आहेत.