मानोरा (Washim):- आकांक्षित तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरीकांना आवागमनासह सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतुने शासन स्तरावरुन लाखो रुपये उपलब्ध करून बंधाऱ्यांचे बांधकाम (Construction) मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र तालुक्यातील मौजे कारखेडा शंकर महाराज मंदिरापासून वाहणाऱ्या अरूनावती नदी लगत शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्याचा वापर करून जलसंधारण बंधारा थातुर मातुर उभारण्यात आलेला आहे.
जलसंधारण विभागाचा भोंगळ कारभार
सदरील कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी (inquiry) करून न्याय द्यावा, असे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हा जलसंधारण(water conservation) यांना योगेश सोळंके यांनी पाठविले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, मौजे कारखेडा हे गाव उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूने नदीने वेढलेले असून या गावातील नागरीक नदीच्या पुराने वर्षांनूवर्षांपासून नुकसान सोसत आहेत. त्यामुळे अरूनावती नदीचे योग्य खोलीकरण व रुंदीकरण करून हा जलसंधारण बंधारा दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करून बांधकाम करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता निकृष्ट दर्जाचे साहित्याने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यात अरुणावती नदीला महापूर येतो. जर यावर्षी महापूर आला तर बंधारा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुण नियंत्रक विभागाकडून तपासणी करून सबंधित दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, असे निवेदन तक्रारकरत्याने पाठविले आहे.