कृषी विभागाच्या पथकाची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
कासारशिरसी (DAP Raid) : निलंगा तालुक्यातील हरीजवळगा येथे अवैधपणे डीएपी खत आणून शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्यावरून दिवेकर एस. के. (विभागीय कृषी सह संचालक लातूर), आर. टी. जाधव (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर) यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील पथकाने हरीजवळगा येथे येऊन अवैध व संशयास्पद (DAP Raid) डीएपी खतावर छापा टाकून दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हरीजवळगा येथील शिवाजी रामराव वारले, राजेंद्र सुग्राव वारले व इतर शेतकऱ्यांना (DAP Raid) डीएपी खताची विक्री करण्यासाठी डीएपी खताने भरलेला टेम्पो हरीजवळगा येथे आला असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. या माहितीवरून डी. टी. सुपेकर (कृषी विकास अधिकारी लातूर), एम. बी. बिडबाग (मोहीम अधिकारी जिल्हा परिषद लातूर), एन. एन. कुटवाड (गुणवत्ता नियंत्रण नीरक्षक रासायनिक खते तथा कृषी अधिकारी पंचायत समिती कार्यालय निलंगा) हे सकाळी ८.४० च्या सुमारास हरीजवळगा येथे पोहचले असता या ठिकाणी शिवाजी रामराव वारले यांच्या घरासोमरील चौकात छापा टाकून टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो (क्रमांक एम एच ०४/ डी के ११०६) मिळून आला.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कासारशिरसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली व डीएपी खताने भरलेला सदरील टेम्पो कासारशिरसी पोलीस ठाणे येथे आणण्यात आला. या प्रकरणी जयकिसान पॅरादीप फॉस्फेट भुवनेश्वर उडीसा या लेबलच्या डीएपी खताच्या पन्नास किलो वजनाचे एकूण ८० पोते ( प्रत्येकी किंमत १३५०) प्रमाणे १०८०००/- रुपये व एक टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो एम एच ०४ डी के ११०६ असा असलेला अंदाजे किंमत ४०००००/- रुपये असे एकूण ५०८०००/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपी वाहन चालक महताब गफुरसाब हलगरे व मराठवाडा कृषी केंद्रचे मालक फयाज खमरुद्दीन बिराजदार (दोघे राहणार आनंदवाडी अंबुलगा ता. निलंगा) यांच्यावर गुरनं व कलम गुरनं. ११२/२०२५ कलम खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड ४,५,७,८, १९ सी (iii), व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३(२) (A)(D) व भारतीय न्याय संहिता कलम ३१८ ,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड हे करीत आहेत.
बिल व डिटेल्स नसताना विक्री…
कोणत्याही प्रकारचे खतविक्रीचे बिल व डिटेल्स नसताना मे. मराठवाडा कृषी सेवा केंद्रचे मालक फयाज खमरुद्दीन बिराजदार (रा. आनंदवाडी (अंबुलगा) ता. निलंगा) यांच्या सांगण्यावरून हरीजवळगा येथील शेतकरी शिवाजी रामराव वारले, राजेंद्र सुग्रीव वारले व इतर शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी हे डीएपी खत आणले होते.