गोंदिया (Dasgaon death) : तालुक्यातील दासगाव (खुर्द) येथे शाळेतून घरी जात असलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा मुरूमाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (ता.१३) सायंकाळी ४ वाजता सुमारासची आहे. आलोक भागचंद बिसेन (०८) व प्रिंस किशोर रहांगडाले (०८) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
दासगाव (खुर्द) येथील जिल्हा परिषद हिंदी पुर्व माध्यमिक शाळेत आलोक भागचंद बिसेन व प्रिंस किशोर रहांगडाले इयत्ता तिसरी वर्गात शिक्षण घेत होते. शाळेला सुट्टी झाल्यानंतर दोघेही सोबतीने घराकडे निघाले. दरम्यान शौचास जाण्यासाठी दासगाव मार्गावरील रस्त्याच्या कडेला गेले. परंतु, रस्त्याच्या बाजुला मुरूमाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मुले घरी न परतल्याने पालकाकडून त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान खड्ड्यातील पाण्यात त्याचा मृतदेह दिसून आला.
घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली. रावनवाडीचे ठाणेदार वैभव पवार, पोलिस उपनिरीक्षक सुनिल अंभोरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता पाठविले. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या बाजुने मुरूम व माती खोदकाम करण्यात आले. परंतु, खड्डे समतल करण्यात आले नाही. त्यामुळे या खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आले असून रस्त्यावरून ये-जा करणार्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहेत.