लातूर (Latur):- लातूर तालुक्यातील गातेगाव मंडळात कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी झाली असून या प्रकाराकडे महसूल प्रशासनाने कानाडोळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. दररोज लाखो रुपयांचे गौण खनिज चोरीस जात असताना महसूल व पोलीस प्रशासन नेमकेपणाने काय करीत होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी
लातूर तालुक्यातील साठा शिवारात सर्वे नंबर 53 मध्ये गेल्या पाच सहा महिन्यांपासून बेसुमार मुरमाचा उपसा करून त्याची बिंदिकत वाहतूक या भागातून झाली. सर्वे नंबर 53 मध्ये अकृषीक केलेल्या जमिनीतून मुरमाचा जेसीबीच्या (JCB)साह्याने व हायवाच्या साह्याने उपसा करून मोठे तळेच निर्माण केले गेले जवळपास पाच एकरामध्ये 12 फूट खोलवर खड्डा मारून गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी केली गेली. या गौण खनिजाचा(Minor minerals) सध्याच्या शासकीय दराने व बाजारभावाने हिशेब लावला तर कोट्यवधी रुपयांच्या मुरमाचा काळाबाजार या भागातील तलाठी मंडळ अधिकारी व इतर अधिकारी यांच्या नाकावर टिच्चून केला गेला. हा काळाबाजार होत असताना संबंधित तलाठी व महसूल मंडळाधिकारी नेमके काय करत होते? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मुरुड अकोला परिसरात गौण खनिजाचे मोठे भांडार
लातूर तालुक्यातील गातेगाव मंडळ तसेच चाटा व मुरुड अकोला परिसरात गौण खनिजाचे मोठे भांडार आहे. लातूर शहर, लातूर ग्रामीण भाग, औसा तालुका इतकेच नव्हे, तर रेणापूर तालुक्यातही या भागातून मुरमाचा पुरवठा केला जातो. बिनदिक्कतपणे हायवामधून एकाच वेळी किमान सहा ब्रास (Brass) इतका मुरूम वाहतूक केली जाते. दिवसाढवळ्या जेसीबी व पोकलेनच्या साह्याने कोदकाम करून मुरमाची चोरी होत असताना प्रशासनाने आपल्या डोळ्यावर झापड का म्हणून ओडवून घेतली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. यातून प्रशासनातले नेमके कोणते अधिकारी मालामाल झाले? याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणेही आवश्यक आहे.