परभणी/पालम (Parbhani) :- तालुक्यातील पेठशिवणी येथील सूतगिरणीत काम करणारे कर्मचारी चंद्रकांत पुंडलिकराव फुले (५२, गोलेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) यांचा सुतगिरणी परिसरात हौदात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सुतगिरणी परिसरात हौदात बुडून मृत्यू
चंद्रकांत फुले हे पेठशिवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीमध्ये मागील १५ वर्षापासून कॅशिअर या पदावर कार्यरत होते. येथील परिसरात पत्नीसह वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने पत्नी कमलबाई फुले यांनी चंद्रकांत फुले यांच्या मोठ्या भावाला फोन करून माहिती दिली. तसेच रात्री उशिरापर्यंत परिसरात त्यांचा शोध घेतला. दरम्यान, पहाटे ४ वाजेच्या सुमारास सूतगिरणी परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ कमलबाई आल्या असता तेथे त्यांना चंद्रकांत फुले यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला काही कामगारांच्या मदतीने चंद्रकांत यांचा मृतदेह (Dead body)बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पालम पोलिसांनी पंचनामा करून पालम येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करत आहेत.