पूर्णा(Purna):- बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी येथिल एका ५४ वर्षीय शेतकऱ्यांने विषप्राशन (poisoning) केल्याची घटना उघडकीस आली होती. विष प्राशन केलेल्या त्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू (death) झाला असल्याची माहिती आहे.
निर्सगाच्या लहरीपणामुळे मागील काही वर्षात शेतक-यांचे उत्पन्न घटले असून, शेतकरी (farmer)आर्थिक संकटात सापडला आहे. डोक्यावरील कर्जाचं डोंगर वाढत चालल्याने शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्णा तालुक्यात महीनाभरात फुकटगांव तसेच गोविंदपूर आणी आता कोल्हेवाडी येथिल तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. पूर्णा तालुक्यातील कोल्हवाडी येथिल मृत शेतकऱ्यांचा मुलगा कृष्णा पवार यांनी पोलीसांत दिलेल्या खबरीनुसार शेतकरी गंगाधर माणीकराव पवार वय ५४ वर्षे यांच्या नावे कानडखेड-२ येथिल शिवारात गट नं. ५३९ मधील पाच एकर शेतीवर त्यांनी पूर्णा स्टेट बँकेच्या (State Bank) शाखेचे सुमारे दिड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
उत्पन घटल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असतानाच त्यांनी २० एप्रिल रोजी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन केले होते. दरम्यान त्यांना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात (police station) गंगाधर पवार यांच्या आत्महत्ये (Suicide) प्रकरणी नोंद करण्यात आली असून, तपास जमादार रमेश मुजमुले हे करत आहेत.