निलंगा (Latur):- महाराष्ट्र आणि देश वेगाने पुढे जात आहे. देशाचा अत्यंत वेगाने विकास होत आहे, अशी विधानं राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्या तोंडून सातत्याने ऐकायला मिळतात. विकास होत आहे. हे सांगण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार करोडो रुपये जाहिरातींवर खर्च करत आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनेक गावांना स्मशानभूमीच (Cemetery) नाहीत.
निलंगा तालुक्यातील अनेक गावांना स्मशानभूमीच नाही..
गाव पातळीवर भीषण वास्तव दिसून येत असून, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बोरसुरी, सावनगिरा, मानेजवळगा, सावरी, गुऱ्हाळ, सिरसी (हं.) या गावांसह तालुक्यातील अनेक गावात स्मशानभूमी नाहीत. वर्षानुवर्षे मयतावर अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावे लागत आहेत. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अनेक गावातील लोकप्रतिनिधी, गावकरी, सामाजिक कार्यकर्ते यांनी करीत तहसील कार्यालय, पंचायत समितीत खेटे घातले. मात्र हा प्रश्न काही सुटला नाही. अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन लालफितीतच अडकले तर या लोकप्रतिनिधींनीही हा प्रश्न गांभिर्याने घेतला नाही. परिणामी नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वर्षानुवर्षे नागरिकांचे हाल…
पावसाळ्यात जोराचा पाऊस सुरू असल्याने अनेक गावात अंत्यसंस्कार कोठे आणि कसे करायचे? हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. पावसाळ्यात पावसाने उघडीप दिल्यानंतरच रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थ व नातेवाईक घेत असतात. अंत्यसंस्कार सुरू असताना पुन्हा जर पुन्हा पाऊस आला तर जळत्या चितेवर नागरिकांना अक्षरशः पत्रे धरुन थांबावे लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे नागरिक हाल सहन करत आहेत.