परभणी/गंगाखेड(Parbhani):- वाहतूक ठेकेदाराच्या नावाने गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडने परस्पर उचललेल्या बेकायदेशीर कर्ज (Illegal loan) प्रकरणी गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील वयोवृध्द वाहतूक ठेकेदाराने मंगळवार २० ऑगस्टपासून गंगाखेड शुगर व चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदाराविरुद्ध सुरू झालेल्या उपोषणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
रासप चे आ.गुट्टेंच्या विरोधात उपोषण
गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील भगवान रोहिदास भोसले वय ७६ वर्ष या वयोवृध्द इसमाने २०१४-२०१५ साली तालुक्यातील विजयनगर माखणी येथील गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी प्रा.लि. कडे वाहतूक ठेकेदार म्हणून ट्रॅक्टर (tractor) लावले होते. यादरम्यान साखर कारखान्याकडून कसले ही कर्ज अथवा उचल रक्कम घेतली नाही. या वाहतूक भाडेपोटीचे साडे चार ते पाच लाख रुपये बिल आज ही गंगाखेड शुगर्सकडे प्रलंबित आहे. मागील सहा वर्षांपासून भगवान भोसले यांना अंबाजोगाई येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेकडून कर्ज वसुलीच्या नोटीस येत आहे. चौकशीअंती माझ्या नावे चेअरमन आ. रत्नाकर गुट्टे, सुनील गुट्टे यांच्यासह गंगाखेड शुगर्सचे अधिकारी आणि बँकेच्या अधिकार्यांनी करारादरम्यान घेतलेल्या कागदपत्रा आधारे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. मागील सहा वर्षांपासून बँकेकडून येत असलेल्या नोटीसीमुळे मानसिक त्रास होत असल्याचे तक्रारीत नमूद करून ठेकेदार भगवान रोहिदास भोसले यांनी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बनावट कर्ज प्रकरणी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तहसीलदारांचे गंगाखेड शुगर्सला पत्र
गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी प्रा. चे चेअरमन रत्नाकर गुट्टे व सुनील गुट्टे यांनी माझ्या नावे बेकायदेशीर कर्ज उचलल्यामुळे मानसिक त्रासापोटी भगवान रोहिदास भोसले हे दि. २० ऑगस्ट रोजी पासून गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसत असल्यामुळे त्यांच्या निवेदनात मुद्द्यांच्या अनुसार योग्य ती कारवाई करून अर्जदारांना कळवावे व अर्जदारास आमरण उपोषणापासून परावृत्त करावे. केलेल्या कारवाईचा अहवाल तहसील कार्यालयास तात्काळ सादर करावा असे पत्र दि. १६ ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने गंगाखेड शुगर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पाठविण्यात आले आहे.