मानोरा(Washim):- राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदार संघाची (Assembly constituencies) निवडणूक होवू घातली आहे. मात्र कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांचे नाव जाहीर न केल्यामुळे मतदार राजांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कार्यकर्ते, समर्थक संभ्रमात
मागील पंचवार्षिक निवडणूकीत तिरंगी लढत झाली होती. यावेळी बहुरंगी लढती होण्याची शक्यता दिसत आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात असतील असा होरा आहे. या प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही आपले उमेदवार घोषीत केलेले नाही. त्यामुळे उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाजपा पक्षाचे (BJP party) मागील दोन टर्म पासून मतदार संघावर वर्चस्व आहे. लोकनेता स्व. आमदार राजेंद्र पाटणी हे १० वर्षांपासून आमदार आहेत. राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच इच्छूक उमेदवार पक्षाकडे तिकीट मागणी करीत आहेत. परंतु कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागण्यासाठी सुध्दा अनेक उमेदवार इच्छूक आहे.