सामाजिक उपक्रम व स्मारकांसाठी प्लॉटस् विकून सहकार्य!
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : इतर आमदारांच्या संपत्तीत कैक पटीने वाढ होत असतांना आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या संपत्तीत मात्र, तब्बल अडीच कोटींनी घट झाली असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीत नमूद केले आहे. ही घट सामाजिक उपक्रमांसाठी दिलेले आर्थिक योगदान व बुलढाणा शहरातील विविध स्मारकांसाठी प्लॉटस् विकून दिलेला स्वनिधी.. यामुळे झाली असल्याचे आ.संजय गायकवाड यांनी सांगून, संपत्तीत जरी घट झाली असलीतरी, आपण जोपासलेला मानव धर्म हा चौपटच नाहीतर कैकपट जास्त असल्याचे त्यांनी ‘देशोन्नती’शी बोलतांना सांगितले.
संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी निवडणूक आयोगाकडे नामांकन अर्ज दाखल करतांना दिलेल्या माहितीत त्यांची संपत्ती ही आदीच्या शपथपत्रात ५ कोटी ५५लक्ष रुपये होती, तर आता ती ३ कोटी ४२ लक्ष ९२ हजार १६३ रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अगोदरच्या शपथपत्रात कुणाल व पृथ्वीराज या दोन मुलांची मिळून संपत्ती होती, आता ती वेगळी दाखविण्यात आली आहे.
तरीसुध्दा संपत्तीत घट येण्याचे कारण संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी त्यांची सामाजिक उपक्रमशिलता मानली असून, ती बाब गौरवाची असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, बुलढाणा शहरात विविध स्मारकांची निर्मिती झाली त्या प्रत्येक स्मारकांमध्ये आपला स्वनिधी आहे. त्यासाठी वडिलोपार्जीत संपत्ती असलेले चार प्लॉटस् विकले. शिवस्मारक समितीने साडेतीन कोटी रुपये जमा केल्याचे जे विरोधक सांगत आहे, ती वस्तुस्थिती वेगळी आहे. काही लाखच जमा झाले होते, व स्मारक जवळपास साडेपाच कोटीपर्यंत पोहचले. त्यासाठी आपण ४० लक्ष रुपयांचा शिवनिधी दिला.
बालशिवबासह जिजाऊ माँ साहेबांच्या पुतळ्यासाठी १६ लक्ष, राजे संभाजी महाराज पुतळ्यासाठी १६ लक्ष, तानाजी मालूसरे , बाजीप्रभू देशपांडे, माता सावित्री, माता रमाई, छत्रपती शाहू महाराज, वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी प्रत्येकी ९ लक्ष रुपयांचा स्वनिधी दिला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, शिवा काशिद, वाल्मीकी महाराज, संत रोहिदास, महात्मा फुले यांच्याही पुतळ्यासाठी प्रत्येकी १ लक्ष रुपयांपासून ४ लक्ष रुपयांचा स्वनिधी स्वखुशीने दिला. यामुळे जरी संपत्तीत घट दिसत असलीतरी आपल्या मानवधर्मात कैकपट वाढ झाल्याचे आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले. याशिवाय जवळपास ४५ कार्यकर्त्यांना प्रत्येकी ३ लाखाची घरे बांधून दिली. आपत्तीत सापडलेल्यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता खिशातून तात्काळ मदत दिली. यामुळे संपत्ती घट झाली असली तरी मानवधर्म कैककपटीने आपण जोपासला असल्याचे आ.संजय गायकवाड यांनी सांगितले.